जयनगर : यावर्षी सुरुवातीपासूनच हरभरा पिकाला कमी भाव भेटत होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला हरभरा बाजारात विकण्याऐवजी साठवणूक करण्यावर भर दिला. मात्र साठवणूक केलेल्या हरभऱ्याला सुरुवातीच्या दरापेक्षा खूपच कमी भाव भेटत असल्याने हरभरा उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
यावर्षी सर्वाधिक हरभरा पीक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर पेरणी केली होते. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकचे भांडवल यावर्षी लावले आहे. जवळजवळ सर्वच हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा हरभरा काढणी १५ ते २० दिवसांपूर्वी संपलेली आहे.
यावर्षी सुरुवातीला मॅक्सीगण हरभरा पिकाला नऊ हजार ते नऊ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दर भेटत होता. पीकेव्हीटू हरभऱ्याला सहा हजार ५०० ते सहा हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल तर गावरानी चाफा हरभऱ्याचे दर सुरुवातीला पाच हजार ४०० ते पाच हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भेटत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मेक्सिकन हरभऱ्याला आठ हजार ७०० ते नऊ हजार रूपये प्रति क्विंटल, तर पीकेव्हीटू हरभऱ्याला सहा हजार २०० ते सहा हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.
सुरुवातीपेक्षा आता खूपच कमी दर मिळत असल्याने हरभरा उत्पादक शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
साठवणूक केलेल्या हरभऱ्याला कमी दर
गेले दोन महिने हरभरा पिकाला खूपच कमी भाव भेटत होता. त्यामुळे अनेक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढतील या अपेक्षेने हरभरा साठवणूक करून ठेवले होते. मात्र साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणात असून, साठवणूक केलेल्या हरभऱ्यालाही खूपच कमी दर मिळत आहे.
मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पिकाची काढणी सुरू होती
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा हरभरा पिकाची काढणी होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. एकाही शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पीक आता दिसताहीये. साधारणतः फेब्रुवारी महित हरभरा पीक काढण्यास सुरुवात झाली. तर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हरभरा पिकांची काढणी चालू होती.
भांडवलासाठी अनेक जण हरभरा विकताना दिसताहेत
- सरासरी दरवर्षाला एकरी आठ ते दहा क्विंटल हरभरा निघत असतो. मात्र, या यावर्षी एकरी सरासरी हरभऱ्याचे उत्पन्न केवळ चार ते पाच क्विंटल निघत आहे.
- त्यातच हरभऱ्याचे दर कमी असल्याने अनेक शेतकरी आपला हरभरा काढून साठवणुकीवर भर देत होते. अनेक शेतकरी भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत होते.
- मात्र दिवसागणिक प्रतिक्विंटल 3 मागे दर कमी होत असल्याने तसेच शेती मशागतीसाठी आणि पपई, केळी यासारख्या पिकांच्या लागवडीसाठी हातात भांडवल राहावे याकरिता अनेक शेतकरी आपला हरभरा विकताना दिसून येत आहेत.
- हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी तीन ते चार हजार रुपये दर कमी मिळत असून, उत्पादनातही घट आल्याने हरभरा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.