नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अलिबागमधील नारंगी गावातून हापूस आंब्याची आवक झाली आहे. हापूसबरोबर केसर आंबाही विक्रीसाठी आला आहे. मुहूर्ताच्या आंब्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी आंबा हंगाम उशिरा सुरू होणार आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये देवगडवरून हापूसची मुहूर्ताची पेटी दाखल होते; परंतु यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला हापूसऐवजी केसरची आवक झाली होती.
गुरुवारी हापूस आंब्याचीही आवक झाली आहे. अलिबागमधील नारंगी गावातील शेतकरी संजयकुमार पाटील यांच्या बागेतून हापूस आंब्याच्या ४ पेट्या व केसरची १ पेटी विक्रीसाठी आली आहे.
मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेल्या या आंब्याला किती भाव मिळणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, देवगडऐवजी अलिबागवरून सर्वप्रथम हापूसची आवक झाली आहे.
यावर्षी हंगाम थोडा उशिरा आहे. नियमित आवक मार्च महिन्यापासून सुरू होणार असल्याचे आंबा व्यापारी भगवान शिंगोटे यांनी सांगितले.