हिंगोली : मार्च एण्ड, नाणेटंचाई, गुढीपाडव्यामुळे गेल्या आठवडाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डातील (Hingoli's market yard) व्यवहार ३ एप्रिलपासून पूर्ववत झाले.
गुरूवारी हळदीची १० हजार क्विंटलची विक्रमी आवक (turmeric Record arrival) झाली, तर भाववाढीची सुवर्ण झळाळीही मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला.
हिंगोली बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्डात (Hingoli's market yard) मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांतील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. हंगामात या ठिकाणी ४ ते ५ हजार क्विंटलची विक्रमी आवक होते.
पंधरवड्यापासून हळदीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यातच मार्च एंडची लगबग आणि नाणेटंचाईच्या सावटामुळे २२ मार्चपासून हळदीची खरेदी-विक्री बंद होती. शेतकऱ्यांकडे हळद उपलब्ध झाल्यामुळे मार्केट यार्ड (Hingoli's market yard) सुरू होण्याची प्रतीक्षा असताना ३ मार्चपासून व्यवहार पूर्ववत झाले. या दिवशी तब्बल दहा हजार क्विंटल हळदीची विक्रमी आवक (turmeric Record arrival) झाल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.
विशेष म्हणजे आवक वाढूनही भाववाढीची झळाळी मिळाली. क्विंटलमागे जवळपास ५०० ते ७०० रुपयांची भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, भुसार मोंढ्यातही सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाची आवक वाढल्याचे पाहायला मिळाले. भुसार शेतमालाच्या भाववाढीची प्रतीक्षा मात्र कायम आहे.
पाचशे ते सातशे रुपयांची सरासरी भाववाढ
हळदीला प्रतिक्विंटल १२ ते १३ हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत होता. त्यानंतर २२ मार्चपासून मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले होते. गुरुवारी व्यवहार पूर्ववत होताच क्विंटलमागे सरासरी पाचशे ते सातशे रुपयांची वाढ झाली. सरासरी १२ ते १४ हजार रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर काही शेतकऱ्यांची निवडक हळद १५ ते १६ हजारांपर्यंत विक्री झाली. एकंदरीत भाववाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यार्ड परिसरात वाहनांच्या लागल्या रांगा
आठवडाभराच्या बंदनंतर सुरू झालेल्या मार्केट यार्डात पहिल्या दिवशी गुरुवारी हळदीची आवक वाढली होती. काही शेतकऱ्यांनी आदल्या दिवशीच मार्केट यार्ड जवळ केले. तर काही शेतकरी हळद घेऊन रात्री दाखल झाले. त्यामुळे ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जवळपास २०० वाहनांची रांग लागली होती. तर दुपारी १२ वाजेपर्यंत तीनशेवर वाहने दाखल झाली होती.
मोठ्या संख्येने वाहने आल्यामुळे यार्ड आवारात रांगा लागल्या होत्या. आलेल्या वाहनांना क्रमांकानुसार मोजमापासाठी सोडताना बाजार समिती कर्मचाऱ्यांना चांगली कसरत करावी लागली.
मोजमापासाठी लागणार तीन दिवस
मार्केट यार्डात विक्रमी आवक झाल्याने मोजमापासाठी तीन दिवस लागणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली. या ठिकाणी एका दिवसात तीन ते साडेतीन हजार क्विंटल हळदीचे मोजमाप होऊ शकते. परंतु, दहा ते बारा हजार क्विंटल हळदीची आवक झाल्यामुळे तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्केट यार्डात मुक्काम ठोकावा लागणार आहे.