Halad Bajar Bhav : एकीकडे सोन्याच्या वाढत्या दराने विक्रमी पल्ला गाठला असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या भावात मात्र सोमवारी क्विंटलमागे सातशे ते एक हजार रुपयांची घसरण झाली.(Halad Bajar Bhav)
चार दिवसांतच १३ हजार ३०० वरून १२ हजार २५० वर भाव आले. परिणामी, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून, भाववाढीची प्रतीक्षा केली जात आहे.
हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. समाधानकारक भाव, वजन काट्यात विश्वासार्हता यामुळे शेतकऱ्यांचा कल येथील मार्केट यार्डात हळद विक्रीकडे असतो.(Halad Bajar Bhav)
सध्या हंगाम सुरू असल्याने दररोज चार ते पाच हजार क्विंटलची विक्रमी आवक होत असून, लिलावाच्या एक-दोन दिवस अगोदरपासूनच शेतकरी वाहनाद्वारे हळद घेऊन दाखल होत आहेत.(Halad Bajar Bhav)
या ठिकाणी रविवारीच जवळपास दीडशे वाहने दाखल झाली होती. तर सोमवारी दुपारपर्यंत हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांची संख्या २५० वर पोहोचली होती. सुमारे पाच ते सहा हजार क्विंटलची आवक झाल्याने मार्केट यार्ड आवारातही वाहने उभी करण्यास जागा अपुरी पडली. त्यामुळे अनेक वाहने बाहेरील रस्त्यावर रांगेत उभी करण्यात आली होती.
बाजार समितीच्या सूचनेनुसार सकाळी ११ वाजेच्या सुमारास बीट पुकारण्यास सुरुवात झाली. यावेळी मात्र भावात क्विंटलमागे सातशे ते एक हजार रुपयांची घसरण झाली.
भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, जागतिक बाजारपेठेत भावात होत असलेल्या चढ-उताराचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मार्केट यार्ड आवारासह बाहेरही वाहनांची रांग
सध्या हळदीचा हंगाम सुरू असल्यामुळे आवक वाढत आहे. सोमवारच्या बीटसाठी रविवारीच शेतकरी हळद घेऊन मार्केट यार्डात दाखल झाले होते. आवक वाढल्याने मार्केट यार्ड आवारासह बाहेरील रस्त्यावरही वाहनांची रांग लागली होती.
भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा...
मागील वर्षी हळदीला सरासरी १४ ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. यंदा तर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे किमान मागील वर्षीएवढा भाव तरी मिळेल, अशी आशा होती. मात्र, यंदा उत्पादनात घट होऊनही भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. अनेक हळद उत्पादक शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
हळदीच्या भावात झालेली घसरण
दिनांक | सरासरी भाव |
१५ एप्रिल | १२,८५० |
१६ एप्रिल | १३,१५० |
१७ एप्रिल | १३,००० |
२१ एप्रिल | १३,००० |
२२ एप्रिल | १३,३०० |
२३ एप्रिल | १२,७५० |
२४ एप्रिल | १२,८५० |
२८ एप्रिल | १२,२५० |