योगेश गुंड
अहिल्यानगर : फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी युगुल 'व्हेलेंटाईन डे' सह 'व्हेलेंटाईन विक'चीसुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. व्हेलेंटाईन विकचा संपूर्ण आठवडा आता संपला असून, आज, शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे.
या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांजवळ आपले प्रेम व्यक्त करतात. केवळ कपलच नव्हे, तर हल्ली मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्यदेखील केवळ आनंद, मौज म्हणून व्हेलेंटाईन डे साजरा करतात.
याच दिवशी आपल्या प्रियजनाला गुलाब फुल देण्याची प्रथा आहे. यामुळे सध्या गुलाब फुलाच्या किमतीत तिप्पट वाढ झाली आहे. नगरच्या बाजारात सध्या प्रती क्विंटल ४० हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.
व्हॅलेंटाईनचा मळा
अहिल्यानगर तालुक्यात अकोळनेर व नागरदेवळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात व्हॅलेंटाईनचा मळा फुलविला आहे. या मळ्यात उत्पादित होणाऱ्या गुलाबांना मोठी मागणी आहे. यात सोफिया गुलाब (खुल्या शेतातील) गुलाब व रोपवाटिकेतील गुलाबांची लागवड होते. नगर शहरात फुलांच्या दुकानात सजावट करण्यात आली होती. गुच्छ, भेटवस्तू, गुलाबाची फुले, भेट कार्ड यांनी दुकाने फुलली होती.
सध्या नगरच्या फुलांच्या बाजारात गुलाब फुलांची आवक वाढली आहे. रोपवाटिकेतील गुलाबाचे दर तिपटीने वाढले आहेत. एरवी १० रुपयांना मिळणारे हे फुल व्हॅलेंटाईन मुळे ३० रुपयांना विकले जात आहे. सध्या २० फुलांची एक गड्डी ३०० रुपयांना विकली जात आहे. - वसंत आगरकर, फुलांचे व्यापारी
लाल गुलाब देण्याची प्रथा कशी सुरू झाली?
व्हॅलेंटाईन डे ला गुलाब देण्याची परंपरा १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. स्वीडनचा राजा चार्ल्स बारावा पर्शियाला भेट देत असताना त्याला फुलांच्या भाषेबद्दल ऐकायला मिळाले. म्हणजे, न बोलता, फक्त फुलांच्या रंगांमधून तुमच्या भावना व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग. त्यानंतर, ही फॅशन स्वीडनमध्ये आली आणि काही वेळातच ती संपूर्ण युरोपमध्ये एक ट्रेंड बनली.