गजानन वाघ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी, मांडणा, सारोळा, खेडी, पालोद, अन्वी, चिंचपूर, चांदापूर, बाहुली, आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली होती. मात्र, सध्या हिरव्या मिरचीचेबाजारभाव तळाला गेले असून, त्यातच तोडणीसाठी मजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.
लिहाखेडीसह परिसरात शेतकरी दरवर्षी उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. दरवर्षी या मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने लागवड वाढविली आहे. असे असताना आता मिरचीचे भाव कोसळल्याने आर्थिक फटका बसला आहे.
सध्या बाजारात मिरचीला प्रति किलो २० ते ३० रुपये दर मिळत आहे, म्हणजेच प्रतिक्विंटल अवघे दोन ते तीन हजार रुपये. एवढ्या कमी भावात विक्री करून शेतकऱ्यांना मजुरांचेही पैसे देणे परवडत नाही.
परिणामी अनेक शेतकरी मिरची तोडून विकण्यासाठी असहाय बनले आहेत. याबाबत लिहाखेडी येथील सीताराम गोरे म्हणाले, मिरचीला भाव वीस ते तीस रुपये मिळतोय, मग मजुराला काय द्यावं आणि आम्ही काय घ्यावं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,"
शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी
अल्प भाव आणि मजूरटंचाई या दुहेरी संकटातून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शासकीय खरेदी योजना किंवा किमान आधारभूत भाव जाहीर करणे, मजूर योजनांचा लाभ पोहोचविणे तसेच बाजारात भाव स्थिरता राखणे याकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
वेळेवर तोडणी न झाल्यास नुकसान
मिरचीचे पीक वेळेत न तोडल्यास उत्पादन घटते आणि शिल्लक मिरची सडून जाते. त्यामुळे एकतर उत्पादनाचा दर्जा घसरतो किंवा संपूर्ण पीक वाया जाते. यातून उत्पन्नावर थेट परिणाम होतो. अशात शेतकरी मजुरांना शिलकीच्या रकमेत पैसे देऊनही त्यांना कामाला तयार करता येत नाही.
परिसरात मजूरटंचाई गंभीर झाल्याने मिरची तोडणी, वाहतूक, विक्री या साऱ्या प्रक्रियांमध्ये अडथळे येत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट, असे दुहेरी नुकसान होत आहे.
हेही वाचा : मर रोग आणि कीड नियंत्रणात उपयोगी जैविक बुरशी 'ट्रायकोडर्मा' शेतकऱ्यांसाठी वरदान