Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाटनांद्राच्या मिरचीला युद्धाचा फटका; मजुरी, मल्चिंग पेपर, खतांच्या किंमतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:20 IST

कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे हक्काचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा कल दिसून येत आहे. मात्र, जागतिक पातळीवरील घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे यावर्षी लागवडीचा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे.

दत्ता जोशी 

कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे हक्काचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा कल दिसून येत आहे.

मात्र, जागतिक पातळीवरील घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम शेतीवर झाला असून, यावर्षी लागवडीचा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. तरीही 'जोखीम घेतल्याशिवाय नफा नाही' या विश्वासावर शेतकरीमिरची लागवडीला प्राधान्य देत आहेत.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा व परिसरात सुमारे २५० ते २७५ हेक्टरवर दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये मिरची लागवड होत होती. मात्र, यंदा या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, आतापर्यंत तब्बल ३ हजार ५०० हेक्टरच्या वर लागवड झाली आहे.

अजूनही मे महिन्यापर्यंत ही लागवड सुरूच राहणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरही शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाला नसला, तरी आर्थिक गणित जुळवताना त्यांची ओढाताण होत आहे.

मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च किंमत रुपयांत

घटक गतवर्षी किंमतयंदाची किंमतवाढ
मल्चिंग पेपर१,१०० १,८०० ७०० 
रोपे (प्रति रोप)१.२० १.७० ०.५० 
मजुरी ३०० ५०० २०० 
खत१,९०० २,१०० २०० 

एकरी मिरची लागवड खर्चाचा टप्पा ४० हजार पार

• यंदा मिरची लागवडीचा एकरी खर्च ४० हजार रुपयांच्यावर पोहोचला असून मल्चिंग पेपर, रोपे, खत आणि मजुरी या सर्व घटकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

• गतवर्षी १ हजार १०० रुपयांना मिळणारा मल्चिंग पेपर यंदा तब्बल १ हजार ८०० रुपयांवर गेला असून, रोपांची किंमत १.२० रुपयांवरून १.७० रुपयांपर्यंत वाढली आहे.

• मजुरीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, ३०० रुपयांवरून मजुरी थेट ५०० रुपयांवर पोहोचली आहे. खतांचे दरही १ हजार ९०० वरून २ हजार १०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

• खर्च असा गगनाला भिडला असतानाच मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. सध्या बाजारात मिरचीला सुमारे ४ हजार रुपये दर मिळत असून तो उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरा ठरत आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा जवळपास दुप्पट खर्च आला असून, सध्याचा बाजारभाव परवडणारा नाही; पण भविष्यात दर वाढतील, या आशेवर आम्ही दोन एकरांवर मिरचीची लागवड केली आहे. - सागर मोरे, शेतकरी, घाटनांद्रा.

सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्चा माल, वाहतूक आणि आयात खर्च वाढल्याने मल्चिंग पेपर, खते व औषधांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. - शिवाजी मोरे, व्यापारी, घाटनांद्रा.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

English
हिंदी सारांश
Web Title : War hits Ghatnandra chili: Labor, mulch, fertilizer prices surge.

Web Summary : Ghatnandra chili farmers face rising costs due to war impacts. Despite doubled expenses for inputs like mulch and labor, farmers continue planting, hoping for better prices despite current market challenges. Area under cultivation has significantly increased.
टॅग्स :मिरचीशेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनबाजारछत्रपती संभाजीनगर