दीपक दुपारगुडे
आज रविवारी साजऱ्या होणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आ गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर फूल उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीसाठी पाठविल्याने कोमेजलेला फूल बाजार बहरला.
शनिवारी सोलापूरच्या टिळक चौक, मधला मारुती, सात रस्ता, मार्केट यार्ड, लक्ष्मी मार्केट येथील बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाल्याची माहिती फूल विक्रेत्यांनी दिली.
हार, तोरण, तसेच घर-सजावटीसाठी झेंडू, निशिगंध, शेवंती आणि आस्टर या फुलांना विशेष मागणी आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात फुले दाखल झाल्याने विविध प्रकारच्या फुलांना चांगले दर मिळत आहेत. विशेषतः मोगऱ्याच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून, मोगऱ्याचा प्रतिकिलो दर सहाशे रुपये असल्याने त्याच्या गंधाने बाजार दरवळला आहे.
गुढीपाडवा आणि अन्य सण-उत्सवांमध्ये महिलांकडून गजऱ्यासाठी मोगरा फुलांची मोठी मागणी केली जाते. त्यामुळे सध्या मोगऱ्याच्या फुलांना अधिक भाव मिळत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या मोगऱ्याला ६०० रुपये प्रतिकिलो दर मिळत असून, विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत कांही फुलांच्या दरात वाढ आहे, मात्र हे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. बाजारात झेंडूची आवक अधिक आहे, परिणामी झेंडूच्या दरात घसरण आहे. - श्रीशैल घुली, फूल विक्रेते, सोलापूर.
फुलांच्या घाऊक दर
झेंडू | २०-४० |
गुलाब | २००-२५० |
बटन गुलाब | ३०० |
मोगरा | ६०० |
शेवंती | २००-२५० |
निशिगंध | ३०० |
आवक वाढली
शेतकऱ्यांनी फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून, गुढीपाडव्यासाठी माल राखून ठेवल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात फुले दाखल झाली आहेत. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाली आहे. परिणामी मागील आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.