Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी अतिवृष्टीने झोडपले अन् आता दरानेही सोडली साथ; शेतकऱ्यांची बाजारात उघड लूट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:27 IST

Agriculture Market Update : अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसाबसा सावरलेला शेतकरी आता बाजारातही निघृण लुटीचा बळी ठरत आहे. केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाचा पुसटही मागमूस नसताना कापूस, सोयाबीन व मका यांसारखा शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे.

अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसाबसा सावरलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आता बाजारातही निघृण लुटीचा बळी ठरत आहे. केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाचा पुसटही मागमूस नसताना कापूस, सोयाबीन व मका यांसारखा शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे.

हमीभावाचा कायदा नसल्याची पोकळी आणि व्यापाऱ्यांची मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखात भर पडली असून, बळीराजा 'हमी' नव्हे तर 'हवालदिल' अवस्थेत बाजारपेठेत उभा आहे. या परिस्थितीवरून विधिमंडळातही गदारोळ झाला असला तरी जमिनीवरील वास्तव मात्र बदललेले नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप पिके जमिनीसह वाहून गेली, तर शेतात पाणी साचल्याने जागेवरच पिके सहून गेली. माथ्यावर शेती असलेल्या शेतकऱ्यांची काही प्रमाणात पिके वाचली आहेत.

यातून हाती आलेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत; पण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार शेतमालाची कुठेही खरेदी होत नाही.  केंद्राने २०२५-२६ या वर्षासाठी पिकांचे हमी भाव जाहीर केले आहेत.

यात सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ५ हजार ३२८ रुपये दर जाहीर केला असताना गंगापुरात ४ हजार ५३, कन्नड, वैजापूर, सिल्लोडमध्ये ४ हजार ५०० आणि लासूर स्टेशन येथे ४ हजार ३५० रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च दर मिळत आहे.

तर क्वालिटी चांगली नसल्याच्या कारणावरून ३ हजार रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे नाईलाजाने या ५ बाजार समित्यांमध्ये या हंगामात आत्तापर्यंत ८ हजार ४३१ क्विंटल सोयाबीनची शेतकऱ्यांनी विक्री केली आहे.

बाजारात मिळत असलेला दर आणि हमीभाव 

• सोयाबीन केंद्र हमीभाव (प्रती क्विंटल) - ५,३२८

बाजारातील भाव - गंगापूर - १४,०५३., कन्नड/वैजापूर/सिल्लोड - १४,५००.,  लासूर स्टेशन - १४,३५०.

यासह ३,००० रुपये प्रती क्विंटक पर्यंत क्वालिटी नीट नसल्यामुळे. 

• कापूस केंद्र हमीभाव (प्रती क्विंटल) - ७७१० मध्यम धागा तर ८११० लांब धागा 

बाजारातील सर्वोच्च भाव सिल्लोड येथील - ७३००. 

सर्वात कमी भाव सिल्लोड येथे - ५०००. 

• मका केंद्र हमीभाव (प्रती क्विंटल) - २४००. 

बाजारातील सर्वोच्च भाव कन्नड/वैजापूर येथील - १८५०. 

सर्वात कमी भाव कन्नड बाजार येथे - ९००. 

विधानसभेतही गाजला प्रश्न

राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी शेतमालाच्या हमीदराची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून गदारोळ झाला. कॉंग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला 'लोकमत'ने घेतलेल्या आढाव्यानंतर पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे.

लासूर स्टेशन येथे कापसाच्या गाड्या परत पाठविल्या

• केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार ७१०, तर लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ११० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. असे असताना जिल्ह्यातील एकाही बाजार समितीमध्ये हमीभावानुसार कापसाची खरेदी केली जात नाही.

• जिल्ह्यात सर्वोच्च सिल्लोडमध्ये ७ हजार ३०० आणि सर्वांत कमी ५ हजार रुपये प्रति क्विंटल सिल्लोडमध्येच कापसाला भाव मिळाला. कापसाची क्वालिटी चांगली नसल्याच्या कारणावरून लासूर येथे १५ ते २० गाड्या परत पाठविण्यात आल्या.

मक्याची अर्ध्यापेक्षा कमी दराने खरेदी

• केंद्र शासनाने मक्याला या वर्षासाठी प्रति क्विंटल २ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात या दरात कुठेही मक्याची खरेदी केली जात नाही.

• जिल्ह्यात सर्वोच्च १ हजार भाव कन्नड आणि वैजापुरात मिळाला, तर सर्वांत कमी १०० रुपये प्रति क्विंटलचा भाव कन्नडमध्ये मिळाला. त्यामुळे हमीभावाच्या अर्ध्यापेक्षा कमी दराने खरेदी मक्याची खरेदी होत आहे. ८५० रुपये प्रति क्विंटलचा

• परिणामी, शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीमकासोयाबीनकापूसछत्रपती संभाजीनगर