बाळासाहेब माने
हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने होणारा त्रास आता मिटला आहे. नाफेडने शेतकऱ्यांसाठी 'ई-समृद्धी' हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे.
या ॲपमध्ये चेहरा आणि डोळे स्कॅन करून आधार पडताळणी करत नोंदणी करता येणार आहे. यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांची केंद्रावर तासनतास रांगेत उभे राहून अंगठ्याचे ठसे देण्याची कसरत थांबणार आहे. यामुळे सोयाबीन विक्रीची नोंदणी प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा होतो. यामुळे काढणी सुरू झाल्यापासून सोयाबीन विक्री होईपर्यंत शेतकरी स्वस्थ बसत नाहीत. हमीभाव केंद्र सुरू होण्यापूर्वी ज्या व्यापाऱ्याकडे चांगला भाव मिळतो तेथे धान नेण्याची अन् माप करण्याची घाई असते.
हमीभाव केंद्र सुरू झाले की, केंद्र निवडून ऑनलाइन नोंदणीसाठी हाताचे ठसे, सर्व्हर डाउन यासह इतर कारणांमुळे केंद्रावर हेलपाटे मारावे लागतात. यात शेतकऱ्यांची गैरसोय होते, हे टाळण्यासाठी नाफेडने 'ई-समृद्धी' ॲप उपलब्ध करून दिले आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ वाचणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र तयार ठेवावे लागणार आहेत.
०५ हजार ३२८ रूपये आहे हमीभाव
सोयाबीनसाठी शासनाकडून ५ हजार ३२८ रूपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यानंतरच खरेदी केंद्रांकडून सोयाबीन खरेदी केले जाणार आहे.
चेहरा व डोळे स्कॅन करून नोंदणी
• या ॲपचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, नोंदणी करताना आता बोटांचे ठसे देण्याची आवश्यकता नाही.
• सर्व्हर डाउन असला किंवा केंद्रावर गर्दी असली तरी, शेतकरी आता घरबसल्या आपल्या मोबाइल ॲपवरून नोंदणी पूर्ण करू शकतात. नाफेडने या ॲपमध्ये चेहरा आणि डोळे स्कॅन करून आधार पडताळणी करण्याची अत्याधुनिक सुविधा दिली आहे.
• याचा थेट फायदा वयोवृद्ध शेतकऱ्यांना होणार आहे. अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याने किंवा तासनतास रांगेत उभे राहून होणारी गैरसोय यामुळे पूर्णपणे टळणार आहे.
अशी करा मोबाइल ॲपद्वारे नोंदणी
• सोपी नोंदणी : शेतकरी घरबसल्या ॲपद्वारे नोंदणी करू शकतात.
• थेट सहभाग : यात मध्यस्थांची गरज नसते, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा मिळतो.
• पारदर्शकता : यामुळे खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येते.
• ॲपचा वापर : नोंदणीसाठी गुगल प्ले स्टोअरवरून 'ई-समृद्धी' ॲप डाउनलोड करावे लागते.
• नोंदणी प्रक्रिया: ॲप उघडून मोबाइल नंबर टाकून ओटीपीद्वारे लॉगिन करता येते.
• अर्जाचा मागोवा : नोंदणीनंतर शेतकरी आपल्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात.
ई-समृद्धी ॲपमुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली आहे. शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली सोयाबीन नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी. यासाठी हमीभाव केंद्रावर येण्याची गरज पडणार नाही. - दीपक शेलार, खरेदी विक्री संघ, धाराशिव.
