संजय लव्हाडे
जालना येथीलबाजारात सध्या ग्राहक कमी असून, बहुतांश धान्य मालाची आवकही दिवसेंदिवस कमी होत आहे. गहू, तूर, हरभरा, सोयाबीन आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. सोने-चांदीच्या दरात मात्र विक्रमी तेजी आली आहे. सरकी ढेपच्या दरातही वाढ झाली आहे.
हरभरा उत्पादकांना अडचणीत आणणाऱ्या पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला केंद्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. या काळात आणखी ४ ते ५ लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकतो, असा अंदाज आहे. मागील वर्षभर वाटाण्याच्या मुक्त आयातीमुळे हरभरा आणि तुरीचे भाव कमी होण्यास मदत झाली.
हरभऱ्याचा भाव मोठ्या प्रमाणात तुटला होता. आता तर हरभऱ्याचे भाव हमीभावाच्या खाली आले आहेत. तूरही हमीभावाच्या खाली विकली जात आहे. सरकारच्या धोरणामुळे केवळ शेतकरीच नाही तर व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगही अडचणीत आले आहेत. जालनाबाजारपेठेत गावरान हरभऱ्याची आवक ३५०० पोती इतकी असून, भाव ४६५० ते ५२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
काबुली चण्याची आवक दररोज २०० पोती इतकी असून, भाव ५८०० ते ८००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. तसेच यावर्षी गव्हाचे उत्पादन चांगले असून, बाजारात नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. यावर्षी गव्हाचा दर्जा चांगला असून, दररोजची आवक दोन हजार पोती इतकी आहे.
बाजारभाव
ज्वारी | २००० ते ३५०० |
बाजरी | २००० ते ३००० |
मका | १८०० ते २१५० |
तूर | ६५०० ते ७१०० |
सरकी ढेप | ३१०० ते ३३०० |
पाम तेल | १४६०० |
सूर्यफुल तेल | १५३०० |
सरकी तेल | १३९०० |
सोयाबीन तेल | १३७०० |
करडई तेल | २२००० |
नाफेडकडून विक्री सुरू
• हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री नाफेडने बुधवारपासून सुरू केली. त्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव पुन्हा सरासरी २०० रुपयांपर्यंत कमी झाले.
• नाफेडने ज्या भावात सोयाबीन विकले, त्याच भावात प्रक्रिया प्लांटसनी सोयाबीनची खरेदी केली. जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक दररोज १००० पोती इतकी असून, भाव ३४०० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
तेजी अशीच राहणार
सोने दराच्या तेजीने शुक्रवारी कळस गाठला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याने प्रति औंस ३ हजार डॉलरच्या अभूतपूर्व पातळीपुढे झेप घेतली. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरानेही एक लाखांचा टप्पा ओलांडला. ही तेजी कायमस्वरूपी राहण्याची शक्यता आहे.