नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकाचे दर कमी झाल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. केळीला योग्य भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ २ ते ३ रुपये एवढाच भाव मिळत आहे. ही मागील तीन वर्षातील सर्वात नीच्चांकी किंमत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या करण्याची वेळ आली आहे.
एकरी उत्पादन खर्च तब्बल दीड ते पावणेदोन लाख रुपये असताना, प्रत्यक्ष उत्पन्न केवळ ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी निर्यातक्षम बॉक्स पॅकिंग मालाला प्रति किलो २० ते २८ रुपये दर मिळत होता, तर देशांतर्गत बाजारातही कधीही १० रुपयांच्या खाली दर जात नव्हता.
मात्र, या हंगामात भाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने यावर ठोस व तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
केळी रोपांच्या कंपन्या वाढल्या; भाव मात्र नगण्य
• गेल्या दोन वर्षांपूर्वी केळीच्या रोपांसाठी फक्त काही निवडक कंपन्या उपलब्ध होत्या; मात्र आता नवीन कंपन्यांची वाढ झाल्याने लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.
• परिणामी उत्पादने अधिक झाली, पण बाजारात मागणी न वाढल्यामुळे भाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांनी राज्य सरकार आणि कृषी विभागाने केळी उत्पादकांसाठी तातडीने आधारभाव जाहीर करावा.
• अन्यथा पुढील हंगामात शेतकरी केळीची लागवड टाळू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली आहे. केळीचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी वर्ग केळीचे पीक ट्रॅक्टरच्या साह्याने मोडू लागले आहेत.
शेतकऱ्यांच्या हाती कवडीमोल भाव; बाजारात दुपटीचा भाव
• शेतकन्यांकडून ३ ते ४ रुपये किलोने खरेदी केलेल्या केळीची बाजारात १५ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करताना केळी किलोप्रमाणे खरीदी केली जाते.
• मात्र तीच केळी बाजारात डझनाप्रमाणे विकली जाते. एक डझनमध्ये दोन ते अडीच किलो केळी बसतात. ही केळी ४० ते ५० रुपये किलो डझनाप्रमाणे विक्री केली जात असल्याने व्यापारी मालामाल शेतकरी कंगाल अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
• गेल्या तीन वर्षात सर्वाधिक कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. लाखो रूपये खर्च करूनही हाती काही मिळत नसल्याने पोरा-बाळांचे शिक्षण, परिवाराचा गाडा कसा, चालवायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे.
