गोंदिया जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक असून, शासनाकडून धानाला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भात विकले असले तरी स्थानिक, गावठी तांदळासाठी मागणी वाढत आहे. त्यात पारंपरिक लाल तांदळातील आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे ग्राहकांकडून वाढती मागणी असूनही शेतकऱ्यांकडे साठा नसल्यामुळे उपलब्धता कमी पडत आहे.
मजुरांची उपलब्धता, मजुरीतील वाढ, खते आणि कीटकनाशकांचे दर, पावसाची अनियमितता, तसेच वन्य प्राण्यांचा उपद्रव या विविध कारणांमुळे जिल्ह्यातील शेतीचे प्रमाण घटू लागले आहे. शासनाकडून केवळ भातासाठी हमीभाव दिला असल्यामुळे जात शेतकरी स्वतःकडील भाताची विक्री करत आहेत.
दैनंदिन उपयोगासाठी सुवासिक तुकडा तांदूळ किंवा बारीक तांदूळ वापरला जात असला तरी गावठी तांदळाची मागणी वाढू लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दोन ते चार महिन्यानंतर नवीन पीक येणार असल्यामुळे कुटुंबापुरते भात ठेवून उर्वरित भात विकले आहे.
उत्पादन खर्च वाढला, शेतकऱ्यांचा नफा घटला
वाढता इंथन खर्च, खते आणि कीटकनाशकांच्या दरात वाढ, तसेच मजुरी खर्चामुळे भाताचा उत्पादन खर्चही वाढला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा नफा घटत आहे.
भाववाढीची कारणे
वन्यप्राण्यांचा उपद्रव, मजुरांची कमतरता, बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट, तसेच खर्चाच्या तुलनेत उत्पन्न न मिळाल्यामुळे लागवडीचे प्रमाण घटले आहे. यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त असून, त्यामुळे दर वाढले आहेत.
यंदा भाव किती राहणार?
सन २०२४ मध्ये शेतकऱ्यांना भातासाठी प्रतिक्विंटल २,३८७ रुपये दर मिळाला होता. दरवर्षी भाव वाढत असल्यामुळे यावर्षदिखील भाव वाढण्याची अपेक्षा आहे. शासनाने हमीभावात वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या तांदळाचे दर
गावठी जाड तांदळापेक्षा बाजारी बारीक सुवासिक तांदूळ खरेदीला चांगला प्रतिसाद असून, दर ६५ रुपयांपासून ते १२५ रुपये किलोपर्यंत आहे. सुवासिक तुकडा तांदूळ ४५ रुपये प्रतिकिलो दराने विकण्यात येत आहे. तुकडा तांदळाची मागणी वाढत आहे.
नव्या पिकाची प्रतीक्षा
शेतकऱ्यांनी भात लागवड केली असून, पाऊसही चांगला झाल्याने पीक समाधानकारक आहे. नवीन पिकाची कापणी ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा : उच्च शिक्षित दोन भावंडांनी केळीतून कमावले २८ लाख; बारूळच्या केळीचा परराज्यात गोडवा