कौसर खान
धान उत्पादनासाठी ओळखला जाणारा गडचिरोली जिल्ह्याचा सिरोंचा तालुका गेल्या काही वर्षात नगदी पिकांकडे वळला आहे. मिरची आणि कापसाला प्रमाणात मोठ्चा मागणी असल्याने शेतकऱ्यांनी या पिकांवर भर दिला. मात्र, कापसाच्या विक्रीसाठी तालुक्यात एकही आधारभूत खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत आहेत.
वाहतूक, मजुरी, दलाली यामुळे उत्पादकांचा वाढीव खर्च होऊन प्रतिक्विंटल जवळपास ९०० रुपयांचे नुकसान होत आहे. कापसाला शासनाने ८,१०० रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी सिरोंचात व्यापारी केवळ ६ हजार रुपयांपर्यंत भाव देत आहेत. हमीभाव आणि प्रत्यक्ष दर यात मोठी दरी असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
तेलंगणातील वरंगल, चेन्नूर, भोपलपल्ली, मंचेरियाल तसेच महाराष्ट्रातील राजुरा येथे शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. सिरोंचा तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र केव्हा सुरु होणार? असा सवाल उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. व्यापाऱ्यांकडून कापसाला कमी भाव मिळत असल्याने तोटा सहन करावा लागत आहे.
दलाल, व्यापाऱ्यांकडून लूट
तेलंगणातील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कापूस खरेदी करतात. मात्र, ते हमीभावापेक्षा किमान १,५०० ते २,००० रुपये कमी दर देतात. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक गरज असल्याने ते कमी दरात कापूस विकण्यास भाग पडतात. दलालांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
सिरोंचा भाग दुर्गम असल्याने दळणवळणाची साधने अपुरी आहेत. कापूस उत्पादकांना तेलंगणात जावे लागते. वाहतूक खर्च वाढून शेतक-यांचे नुकसान होते. शासनाने येथे खरेदी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक आहे. - शारीक शेख, जिल्हा महामंत्री, अल्पसंख्याक आघाडी भाजप.
तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणात कापूस घेत आहेत; पण विक्रीची सोय नाही. खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांना लुटत आहेत. शासनाने केंद्र सुरू करावे. - बबलू पाशा, उपाध्यक्ष, न.पं., सिरोंचा.
रोजगारासाठीही मजुरांचा तेलंगणाकडे ओढा
• सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, रेंगुठा, पातागुडम, अंकिसा आदी गावांत बेरोजगारी वाढत आहे. वनोपजाची मुबलक उपलब्धता असूनही स्थानिक उद्योग उभे राहत नसल्याने युवकांना तेलंगणात मजुरी व लहान-मोठ्या कामांसाठी स्थलांतर करावे लागते.
• स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीविना परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. राज्य सरकारने सिरोंचा भागात उद्योगधंदे निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून मजुरांचे स्थलांतर परराज्यात होणार नाही.
हेही वाचा : पारंपरिक पिकांना फाटा देत गणेशरावांनी ३५ गुंठे काकडीतून घेतले पावणेदोन लाखांचे उत्पन्न
