राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाचा अंदाज मिळावा, म्हणून सुरू करण्यात आलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातर्फे प्रत्येक आठवड्यात शेतमालाच्या बाजारभावाचा साप्ताहिक किंमत सनियंत्रण अहवाल प्रसिद्ध केला जातो.
या अहवालामुळे शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात त्यांच्या पिकांना मिळणाऱ्या संभाव्य किमतीचा अंदाज घेता येतो आणि बाजारात विक्रीचे नियोजन करता येते. मात्र, गत दोन आठवड्यांपासून हा अहवाल प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना बाजारातील मालाच्या दरातील चढ-उताराची माहिती शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या संकेतस्थळ आणि अधिकृत सोशल मीडियाद्वारे दिली जाते. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, हरभरा यांसारख्या प्रमुख पिकांच्या किमतीचा सविस्तर अंदाज या अहवालात असतो.
स्थानिक बाजार समिती, व्यापाऱ्यांवर अवलंबित्व
स्मार्टचे अहवाल प्रसिद्ध होणे बंद झाल्याने शेतकऱ्यांना स्थानिक बाजार समिती व व्यापाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या बाजार भावांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, बाजार भावांचा पुढचा ट्रेंड काय राहील, हे कळत नाही.
६ ऑक्टोबरला शेवटचा अहवाल प्रसिद्ध
• स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाकडून ६ ऑक्टोबर २०२५ रोजी शेवटचा साप्ताहिक किंमत सनियंत्रण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता.
• त्यानंतर आजपर्यंत कोणताही अहवाल प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील आठवड्यांतील संभाव्य बाजारभावांची माहिती मिळत नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव
• अनेक शेतकरी अहवालावर आधारित विक्रीसाठी योग्य वेळ आणि बाजार ठरवतात. मात्र, गत दोन आठवड्यांपासून अहवाल प्रसिद्ध न झाल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव जाणवत आहे.
• सध्या खरीप हंगामातील पिकांची विक्री सुरू असून, कापूस आणि सोयाबीनच्या दरामध्ये चढ - उतार सुरू आहे. अशा परिस्थितीत किंमत अंदाज अहवाल बंद राहिल्याने शेतकऱ्यांना कोणत्या बाजारात चांगला भाव मिळेल, हे समजणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर
• बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव, जळगाव जामोद तसेच आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी गजानन वानखडे म्हणाले, स्मार्ट प्रकल्पाचा अहवाल आम्हाला वेळेवर मिळत असे.
• त्यावरून दराचा अंदाज घेऊन बाजारात माल पाठवत होतो. पण, दोन आठवडे अहवाल न आल्याने कापूस आणि सोयाबीनचा भाव कोठे चांगला आहे हे समजत नाही.
