भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) जाचक अटींमुळे व रोख पट्टी नसल्यामुळे शेतकरी साठवून ठेवलेला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्यास पसंती देत आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे आसपासच्या गावातील कापूस येत असल्याने संकलन केंद्राचे स्वरूप आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे.
शासनाने कापसाला प्रतिक्विंटल ८१०० रुपये हमीभावाने खरेदीची हमी दिली आहे. मात्र, सीसीआयच्या केंद्रावर कापसाच्या गुणवत्तेबाबत विविध जाचक अटी व निकष लावले जात आहेत.
तसेच खरेदी केलेल्या कापसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. यामुळे शेतकऱ्यांनी रोखीचा व्यवहार करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे.
टाकळीभान परिसरात सध्या स्थानिक व बाहेरील व्यापारी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करत आहेत. खासगी व्यापाऱ्याकडून सध्या कापसाला ७१०० रुपये दर मिळत आहे.
हा दर शासकीय हमीभावापेक्षा कमी असला तरी रोखीचा व्यवहार होत असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना पसंती देत आहेत.
अधिक वाचा: सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर
