खान्देशात सीसीआयच्या केंद्रांवर होणारी खरेदी आणि खासगी बाजारात होणारी खरेदी यात मोठी तफावत दिसून येत आहे. संपूर्ण खान्देशात सीसीआयच्या केंद्रावर आतापर्यंत केवळ २५ हजार क्विंटल गाठींची खरेदी झाली आहे. याउलट, याच कालावधीत खासगी बाजारात २ ते अडीच लाख क्विंटल गाठींची खरेदी झाली आहे.
भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) हमीभावाने खरेदी सुरू झाली असली तरी, खासगी बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेष म्हणजे, हमीभावात अधिक दर मिळत असतानाही, सीसीआयच्या किचकट अटी-शर्तीमुळे शेतकऱ्यांचा कल खासगी बाजाराकडे अधिक दिसून येत आहे.
जादा भाव असूनही, सीसीआयला नकार का..?
सीसीआयच्या केंद्रांवर खासगी बाजारापेक्षा प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपये जादा भाव मिळतो. मात्र, ही जादा रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही महिन्यांची वाट पाहावी लागते.
तसेच, सीसीआय केंद्रावर कापूस आणण्याचा वाहतूक खर्चही शेतकऱ्याला करावा लागतो. या वेळखाऊ प्रक्रिया आणि खर्चाच्या तुलनेत, खासगी बाजारात तातडीने पैसे मिळत असल्याने शेतकरी आपला माल लगेच विकणे पसंत करत आहेत.
शुल्काचा खेळ, पुढील काळात दरामध्ये वाढ होणे अपेक्षित
३१ डिसेंबरनंतर जर कापसावरील आयात शुल्क पूर्ववत होऊन आयातीमध्ये घट झाली आणि त्याच वेळी देशातून कापसाच्या निर्यातीला सुरुवात झाली, तर मात्र स्थानिक कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे, सध्या दराबाबत निराशा असली तरी, पुढील वर्षाच्या सुरुवातीला चांगली दरवाढ होण्याची आशा कायम आहे.
आयातशुल्क हटवल्याने दरात घट
• दरम्यान, केंद्र सरकारने कापसावरील आयातशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत पूर्णपणे हटविल्यामुळे यंदा देशात कापसाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
• दरवर्षी भारत साधारणपणे १५ लाख क्विंटलपर्यंत कापसाची आयात करतो. यंदा मात्र, शुल्क हटविल्यामुळे ही आयात ४५ लाख क्विंटल गाठींपर्यंत पोहोचली आहे. खान्देश जिनींग असोसिएशनचे संचालक विनय कोठारी यांनी याबद्दल माहिती ही दिली.
• आयात वाढल्यामुळे खासगी बाजारात स्थानिक कापसाला मिळणारे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या दर वाढण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती मिळाली.
