कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडील माल फेब्रुवारी-मार्चपर्यंत घरातच ठेवला. मात्र, दर कमी होत असल्याने, जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस मिळेल त्या भावात विक्री करून टाकला.
आता जेव्हा ५ ते १० टक्के शेतकऱ्यांकडेच माल शिल्लक आहे त्यावेळीच कापसाचे दर वाढले आहेत.
क्विंटलमागे झाली दरवाढ
शेतकऱ्यांकडे कापूस असताना त्यांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळाला. आता शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, चोळण्यासारखा प्रकार असल्याचा सूर शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
खासगी बाजारात कापसाला ७४०० ते ८ हजार रुपये आहे दर
खासगी बाजारात महिनाभरापूर्वी कापसाला ६५०० ते ७ हजार रुपयांचा दर मिळत होता. आता मात्र जिनिंगवर जागेवरच ७४०० ते ८ हजार रुपयांचा दर दिला जात आहे. त्यातही माल चांगला असेल तर तसा भाव दिला जात आहे.
सरकीच्या दरवाढीचा परिणाम...
कापसाचे अचानक दर वाढल्याचे मुख्य कारण सरकीच्या दरात झालेली वाढ असल्याचे कॉटन बाजारातील जाणकारांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी सरकीचे दर ३ हजार ३२०० पर्यंत स्थिर होते. हेच दर ३७०० ते ४ हजारपर्यंत गेले आहेत. म्हणून कापसाचे दर वाढल्याचे बोलले जात आहे.
आता कापूस आहे कोणाकडे?
कापसाच्या दरात वाढ झाली असली तरी हा वाढलेला भाव कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याचा नसल्याचे चित्र आहे. कारण, कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे आता मालच शिल्लक राहिलेला नाही. जळगाव जिल्ह्यात केवळ ५ ते १० टक्के शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० ते ११ लाख गाठींची खरेदी पूर्ण झाली आहे.
हे केवळ कापूस नाही, तर सर्व पिकांच्या बाबतीत घडत आहे. शेतकऱ्यांकडे माल असतो तेव्हा दर कमी असतो. शेतकऱ्यांकडील माल व्यापाऱ्यांकडे गेला की, कापूस असो वा इतर धान्य, त्याचे दर वाढतात. यंत्रणा व्यापाऱ्यांच्या फायद्याची असून, शेतकऱ्यांचे शोषण करणारी आहे. - नामदेव दत्तात्रय पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, आव्हाणे जि. जळगाव.
सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्री केल्यावरही कापसाला हमीभाव मिळाला नाही. खासगी बाजारात तर शेतकऱ्यांचा मालही घेतला जात नव्हता, अशी स्थितीही होती. जो माल घेतला गेला, त्याला ६ हजार ते ६४०० पर्यंतचे दर मिळाले. चार महिन्यांपासून शेतकरी दरवाढीची अपेक्षा बाळगून होते. दर वाढले नाही, म्हणून मिळेल त्या दरात माल विक्री केला. आता माल नसतानाच भाव कसे वाढले..? हा एक प्रश्नच आहे. - स्वप्निल जाधव, शेतकरी.
हेही वाचा : नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार