सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ई-नामच्या माध्यमातून ऑनलाइन माल खरेदी व ऑनलाइन पेमेंट करण्याची प्रणाली आहे.
मात्र, ई-नाम नावालाच असून, ऑनलाइन काहीच नोंद नसल्याने पणन मंडळाने असमाधानकारक कामगिरी म्हणून शेरा मारला आहे. त्यामुळे या प्रणालीचा काही उपयोग झाला नाही, हे स्पष्ट होत आहे.
केंद्र शासनाची ई-नाम योजना सोलापूर बाजार समितीमध्ये सुरू आहे. ई-नामच्या कार्यप्रणालीनुसार सर्व शेतमालाची इनगेट एन्ट्री, प्रयोगशाळा अहवाल, ई-लिलाव, ई-पेमेंट व आउटगेट एन्ट्री करणे बंधनकारक आहे.
केंद्र व राज्य शासन सातत्याने कामकाजात सुधारणा करण्याबाबत सूचना देत आहे. मात्र, ई-नाममध्ये काही सुधारणा होत नाही म्हणण्यापेक्षा काम नसल्याचे समोर आले आहे.
काय आहे ई-नाम?- शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी ई-नाम योजना कार्यान्वित आहे.- शेतकऱ्यांच्या शेतमालाचा ऑनलाइन लिलाव होऊन त्यास जास्तीत जास्त बाजार भाव मिळणार आहे.- शेतमालाच्या विक्रीनंतर रक्कम ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.- यासाठी ई-नाम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे- आधार कार्डची छायांकित प्रत.- बँक खात्याची छायांकित प्रत.- मोबाइल क्रमांक.१०० टक्क्यांपर्यंत ई-नामप्रमाणे काम करणे बंधनकारक.
तीन हजार क्विंटलच ऑक्शन पणन मंडळाच्या ऑक्टोबर महिन्याच्या अहवालानुसार शेतमालाची एकूण आवक व त्या प्रमाणात झालेली इन गेट एन्ट्री १ लाख २० हजार ७३५ क्विंटल इतकी आहे. एकूण आवकच्या केवळ १३ टक्के नोंद ऑनलाइनमध्ये आहे. शेतमालाची एकूण आवक व त्या प्रमाणात झालेले ई-ऑक्शन ३ हजार १७३ क्विंटलच आहे. ई-पेमेंट केलेले लॉट शून्य आहे. त्यामुळे पणन मंडळाने असमाधानकारक असा शेरा मारून अहवाल पाठविला आहे.
राज्यातील २८ बाजार समित्यांत ई-नाम प्रणाली आहे. सगळी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ई-नाम सुरू ठेवायचा की नाही, यावर निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे यावर आताच काय निर्णय घेता येणार नाही. मागच्या संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय आहे. - मोहन निंबाळकर, प्रशासक, सोलापूर