लातूर जिल्ह्याच्या उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील बाजारपेठेमध्ये सर्वच शेतमालाची आवक कमी झाली आहे. आवक कमी होऊन सुद्धा दर मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने आवक घटल्याचे सांगितले जात आहे.
मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात चांगले उत्पादन देणाऱ्या तुरीच्या दरातसुद्धा चांगलीच घसरण झाली आहे. दोन वर्षापासून सोयाबीनच्या दारात वाढ झाली नसल्याने दर वाढेल, या अपेक्षेने शेतमाल घरी ठेवून शेतकरी बाजारच्या दराकडे डोळे लावून बसला होता.
परंतु, हंगाम संपला तरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. दरम्यान, सरकारने ४ हजार ८९२च्या दराने शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी केले. परंतु, नावे नोंदवूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांना खरेदीचा मेसेज आला नसल्याने त्यांचे सोयाबीन विक्री झाले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नाइलाजाने बाजारात व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने सोयाबीन विकावी लागली. हरभऱ्याच्या दरातसुद्धा घसरण झाली आहे.
शेतमाल | मागील दर | सध्याचे दर |
सोयाबीन | ४,३०० | ४,२५० |
तूर | ७,३०० | ७,००० |
हरभरा | ५,८०० | ५,६०० |
करडी | ७,२०० | ६,८०० |
शेतमालाची आवक कमी झाल्याचा परिणाम...
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बाजारात सर्वच शेतमालाची आवक कमी-जास्त प्रमाणात होती. परंतु, मागील चार दिवसांपासून मार्केट यार्डात शेतमालाची आवक दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सोयाबीन, तूर, हरभरा, करडी या प्रमुख शेतमालाची आवक कमी झाली आहे.
लग्नसराई व शेतीच्या मशागती कामात शेतकरी
• सध्या सर्वत्र लग्नसराईचा मोसम जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सध्या त्यांच्याकडील शेतमाल पेरणीच्या वेळी विकावे, या उद्देशाने शेतमाल घरीच ठेवला आहे.
• त्यामुळे मालाची आवक कमी होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तसेच अनेक शेतकरी शेतीची नांगरणी करणे व इतर कामात व्यस्त असल्याने शेतमाल विक्री थांबवली आहे.
• सोयाबीनच्या दरात वाढ होणे अपेक्षित असताना मागील चार महिन्यांपासून शेतकऱ्यांची निराशा होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षीचे सोयाबीन भाव मिळेल म्हणून ठेवले आहे.