धानाची आवक कमी झाल्यावर भाव वाढेल, या आशेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. धानाचे भाव वाढण्याऐवजी क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी होऊन ते २ हजार ६५० रुपयांवर आले आहेत. यंदा धानाला मागील वर्षापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दरवर्षी मजुरी, खते आणि बी-बियाणांचा खर्च वाढत असल्याने शेतीचा एकूण खर्च वाढतो. मात्र, या वाढीव खर्चाच्या तुलनेत धान पिकाला मिळणारा भाव मात्र यंदा घसरला आहे. मागील वर्षी धानाला २ हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता.
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला हा दर स्थिर होता; परंतु गेल्या आठ दिवसांपासून यात १०० रुपयांची घट झाली आहे. आवक कमी असूनही भाव पडल्याने बाजारपेठेच्या गणिताने शेतकऱ्यांना चक्रावून सोडले आहे.
इतर पिकांकडे वळत चालला शेतकरी
• धानाची शेती परवडेनाशी झाली असल्याने काही शेतकऱ्यांनी स्वतःची शेती कसणे बंद केले आहे. ती शेती भाड्याने दुसऱ्या शेतकऱ्याला देत आहे.
• काही शेती तर पडिक राहत आहे. त्यातच मागील चार वर्षापासून जिल्ह्यात हत्तीची दहशत निर्माण झाली आहे. चार महिने केलेली मेहनत हत्ती एका दिवसात नष्ट करीत आहेत.
• दिवसेंदिवस धान उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळत चालला असल्याचे दिसून येत आहे.
छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रात भाव कधी ?
• केंद्र सरकारने धानाला २ हजार ३६९ रुपये हमीभाव जाहीर केला असून, महाराष्ट्रात सध्या तोच दर दिला जात आहे. मात्र, सीमेपलीकडील छत्तीसगड राज्यात धानाला ३ हजार १०० रुपये हमीभाव दिला जात आहे.
• शेजारील राज्यात मिळणारा दर पाहता, महाराष्ट्र सरकारनेही ३ हजार रुपयांहून अधिक हमीभाव द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
अतिवृष्टीचा दुहेरी फटका
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पंधरा दिवसांच्या पावसाने धान पिकाचे अतोनात नुकसान केले. पावसामुळे थानाचे फूल झडल्याने उत्पादनात मोठी घट झाली. काही शेतकऱ्यांच्या हाती तर निम्मेच पीक आले आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे कोसळलेले भाव, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.
सामान्यतः धानाची आवक कमी झाली की भाव वाढतात, असा आमचा अनुभव आहे. मात्र, यंदा याच्या उलट चित्र दिसत आहे. भाव वाढण्याऐवजी कमी झाले असून, ते अजूनही खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसोबतच छोटे व्यापारीही अडचणीत सापडले आहेत. - कुमदेव चुधरी, धान व्यापारी, कुऱ्हाडी.
