Join us

रसवंती चालकांकडून उसाला मागणी वाढली; ऊस राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मिळतोय वाढीव दराचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:17 IST

Sugarcane Juice : वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबरच उसाचे दरही कडाडले असून, रसवंतीचालक ऊस मिळविण्यासाठी भटकंती करीत आहेत. जागेवरच ७ हजार तर पोहोच ८ हजार रुपये प्रति मेट्रिक टन ऊस मिळत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उसाच्या रसाची मागणीबरोबरच ग्लासाचे दरही वधारले आहेत.

वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबरच उसाचे दरही कडाडले असून, रसवंतीचालक ऊस मिळविण्यासाठी भटकंती करीत आहेत. जागेवरच ७ हजार तर पोहोच ८ हजार रुपये प्रति मेट्रिक टन ऊस मिळत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उसाच्या रसाची मागणीबरोबरच ग्लासाचे दरही वधारले आहेत.

यंदा पावसाळा जोरदार झाला असला तरी उन्हाळाही त्याच तीव्रतेने जाणवत आहे. दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असल्याने दुपारी १२ वाजेच्या आतच रस्ते सामसूम होत आहेत. शेती कामाच्या ही वेळात बदल झाला आहे. थंडपेयाच्या विक्रीतही वाढ झाली आहे. आता रस्त्या-रस्त्यावर सहज मिळणाऱ्या उसाच्या रसाला अधिक मागणी वाढली आहे. मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाचे क्षेत्रही घटले होते.

यंदाही ऊस कमी पडल्याने कारखाने लवकरच बंद करावे लागले. काही शेतकरी व रसवंतीचालक मुद्दाम कारखान्याऐवजी रसवंतीसाठी ऊस राखून ठेवतात. या राखीव उसाला दरही चांगला मिळतो, सध्या उसाला सात ते आठ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. उसाच्या शेतावर ७ हजार रुपये टन तर रसवंतीवर पोहोच ८ हजार रुपये टनाने ऊस मिळत आहे. हा ऊसही रसवंतीचालकांना भटकंती करून मिळवावा लागत आहे.

उसाचे दर कडाडल्याने रसाचा ग्लासही महागला आहे. प्रत्येक रसाच्या ग्लाससाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत. एकूणच यावर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने उसाचे दर वाढण्याबरोबरच रसवंतीचालकांना ऊस मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या ऊसाच्या रसातून अनेकांचा उदरनिर्वाह भागत असल्याचे दिसत आहे. दिवसभरात हजार ते दोन हजारांची कमाई होत असल्याचे दिसते.

दरवर्षी लाखोंची कमाई

यंदा परतूर शहरात मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. यात काही शेतकरी ऊस कारखान्याला न देता केवळ रसवंतीचालकांना देऊन लाखोंची कमाई करीत असल्याचे दिसून येते.

ऊस घेऊन येताना कसरत

यावर्षी उसाचे भाव दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहेत. सात ते आठ हजार रुपये प्रतिटन ऊस मिळत आहे. हा ऊस मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. उन्हातान्हात जाऊन ऊस आणावा लागत आहे, असे वाटूर-जालना रोडवरील रसवंतीचालक महेश चव्हाण यांनी सांगितले आहे.

परतूर शहरातील रसवंतीगृहांना मोठ्या प्रमाणात बर्फ लागतो, तर ग्रामीण भागातील रसवंतीगृहावर १५ ते २० किलो बर्फ दिवसभरात लागत असतो. त्यामुळे एक लादी ८० ते १०० मिळत असते. - महेश चव्हाण, रसवंतीचालक.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीउष्माघातशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डसाखर कारखाने