मुस्लीम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, बाजारपेठेत खजुरांचा गोडवा वाढला आहे. रोजा सोडताना (इफ्तारच्या वेळी) खजुराला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने धुळे शहरात खजुराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मात्र, यंदा बाजारात आवक घटल्याने खजुराच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, सामान्य खजुरापासून ते महागड्या खजुरांपर्यंतचे विविध प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
तज्ज्ञांचा सल्ला : आरोग्यासाठी खजुराचे महत्त्व
रात्री ५ ते ६ खजूर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि हाडे मजबूत होतात. तसेच दुधासोबत खजूर घेतल्यास अशक्तपणा दूर होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे आहारतज्ज्ञ डॉ. देवयानी उपासनी यांनी सांगितले.
आवक घटली; भाव वाढले!
• यंदा इराण, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तान या देशांमधून खजुराची आवक कमी झाली आहे.
• परिणामी, किलोमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली असून, खजुराचे दर १२० रुपयांपासून ते २ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहे.
• शहरात सध्या दिवसाला सुमारे २०० किलो खजुराची विक्री होत असल्याचे विक्रेते हनिफ बागवान यांनी सांगितले.
• संध्याकाळी रोजा सोडताना खजूर खाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.
• खजुरात नैसर्गिक साखर, फायबर, लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिइंटस मुबलक प्रमाणात असतात.
• दिवसभराची झालेली झीज तत्काळ भरून निघते व शरीराला ऊर्जा मिळते.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
