अकलूज : सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला ३०१ रुपयांचा प्रति किलो उच्चांकी दर मिळाल्याने सहकार पंढरी आता डाळिंब पंढरी म्हणून पुढे येत आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत सिद्धिविनायक फ्रुट कंपनीच्या सागर नागणे यांच्या अडत दुकानी दत्तात्रय पाटील (रा. फोंडशिरस) या शेतकऱ्याच्या भगवा जातीच्या डाळिंबाला ३०१ रु. प्रति किलो दर मिळाला.
तसेच बालाजी फ्रूट कंपनीचे चालक अमोल जाधव यांच्या अडत दुकानी शेतकरी युवराज मारकड (रा. मारकडवाडी) यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला ३०१ रुपये प्रति किलो दर मिळाला.
जय अंबे फ्रुट कंपनी चालक मनोज जाधव यांच्या अडत दुकानी तुकाराम पावले, मोहम्मद साद फ्रुट कंपनीचे चालक राजूभाई बागवान यांच्या अडत दुकानात अंकुशराव केचे यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला ३०१ रुपये प्रति किलो दर मिळाला.
तर शेतकरी गणेश लवटे (रा. फोंडशिरस) यांचे डाळिंब गेले आठ दिवस दररोज २५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. सौदे बाजार वेळी सर्व अडते, खरेदीदार व शेतकरी उपस्थित होते.
चोख वजन अन् रोख पट्टीबाजार समितीत शेतमालाची योग्य प्रतवारी, मापाडी तोलार यांच्याकडून चोख वजन, शेतमालाची रोख पट्टी यामुळे अकलूज बाजार समितीचा नावलौकिक झाला आहे. बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठेत सूक्ष्म नियोजन व पायाभूत सुविधा यामुळे बाजार घटक समाधानी आहेत.
शेतकऱ्यांमध्ये आनंदडाळिंबपूर्व सिझन सुरु होत असताना चांगल्या दरामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकलूज बाजारपेठ मध्यवर्ती असल्याने इंदापूर, माढा, माण, खटाव, फलटण येथून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी अकलूज बाजार समितीकडे आणत आहेत.
अधिक वाचा: तुकड्यांतील जमीन नियमित करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन; १५ दिवसांत निर्णय देणार