यंदा खरीप हंगामात (Kharif season) सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी-जास्त असल्याने शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कापसाचे आर्थिक गणित कुठे तरी चुकल्या सारखे वाटत आहे.
नगदी पीक म्हणून ओळखली जाणारी मूग-उडीद पिके हातातून गेली, तर सोयाबीनवर 'यलो मोझॅक' या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच कपाशीवर बोंडअळी व लाल्या रोगाचा मोठा प्रभाव दिसून आल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. कोरडवाहू (dry) भागात केवळ दोन-तीन वेचणींतच कापसाची उलंगवाडी झाली आहे.
परिस्थिती गंभीर
सध्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. कापसाच्या उत्पादनात मोठी घट आणि बाजारातील (Market) कमी दर यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
आर्थिक गणित
हातात आलेले उत्पन्न | ३,००० |
एकूण खर्च | २०,४०० |
उत्पन्न | (६८०० रुपये/क्विंटल च्या दराने विक्री) |
कपाशी लागवडीवरील सरासरी खर्च (प्रति एकर)
कामे | खर्च |
शेती नांगरणी व मशागत | १,४०० |
कचरा-काडी वेचणे | ६०० |
सरी काढणे (पेरणीसाठी) | ६०० |
कपाशी टोकणी (चार मजूर) | १,६०० |
खत (डीएपी - दोन वेळा) | ५,४०० |
बियाणे (दीड डबा) | १,२०० |
डवरणी (दोन वेळा) | १,२०० |
फवारणी व मजुरी (तीन वेळा) | ३,६०० |
वेचणी खर्च (तीन क्विंटल) | ३,३०० |
दोन-तीन क्विंटल उत्पादन
कोरडवाहू भागात कपाशीची दोन वेचणीतच उलंगवाडी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कोरडवाहू जमिनीत एकरी दोन ते तीन क्विंटलच उत्पादन मिळाले, तर बागायती शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. साधारणतः बागायती शेतीत एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते; मात्र यावर्षी चार ते पाच क्विंटलपर्यंत खाली आले आहे.
५० टक्के उत्पादनात घटले!
यंदा खरीप हंगामात कपाशीची लागवड झाली. गतवर्षी कापूस व सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नसला तरीही शेतकऱ्यांनी याच पिकांना पसंती दिली; मात्र सोयाबीन पाठोपाठ कपाशीनेही अपेक्षा फोल ठरवल्याने उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक घटले आहे.
शेतकरी काय सांगतात.....
यावर्षी सुरुवातीला कमी-जास्त पाऊस झाल्यामुळे दोन वेळा कपाशीची लागवड करावी लागली; मात्र, बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे आणि कमी बाजारभावामुळे शेतीत मोठा तोटा झाला आहे. - आबेद पटेल, शेतकरी, लोहारा
२९ एकरात कपाशीची लागवड केली होती; मात्र लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे लावलेला खर्च निघणेही कठीण झाले आहे. - विठ्ठल पाटील, शेतकरी, बहादुरा
अल्पभूधारक शेतकरी असून, बँकेतून कर्ज काढून कपाशीची लागवड केली; मात्र अवेळी पाऊस थांबल्याने आणि रोगराईमुळे केवळ दोन वेचणींतच कापूस संपला. आता मुलाचे लग्न करायचे कसे आणि बँकेचे कर्ज फेडायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. - भिका पांडे, शेतकरी, लोहारा
हे ही वाचा सविस्तर : QR code : शेतकऱ्यांनो! क्यूआर कोड स्कॅन करा; झटपट मिळवा कागदपत्रे वाचा सविस्तर