अहिल्यानगर : 'सीसीआय'ने कापूस खरेदी गुंडाळल्यानंतर व बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी येऊ लागली आहे.
कापूस विकल्यानंतर भात वाढल्याने शेतकरी मात्र हताश होत असून, हे तर जखमेवर मीठ, असा अनुभव त्यांना येत आहे. जिल्ह्यात कापूस खरेदी-विक्री हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू झाला.
सुरुवातीला कापसाला दर्जानुसार ६९०० ते ७१०० रुपये भात मिळाला. त्यानंतर हा दर सात हजारांवर स्थिरावला. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कापूस खरेदी नोव्हेंबर डिसेंबरपासून सुरू केली.
सीसीआयच्या केंद्रांवर ७२०० ते ७४०० भाव मिळाला, तर काही मोजक्या खासगी व्यापाऱ्यांकडूनही दर्जानुसार चांगला भाव मिळाला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला, तर भाव आणखी वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही.
१२ मार्चदरम्यान सीसीआयने खरेदी बंद केली. त्यानंतर काही दिवस भाव सात हजारांभोवतीच राहिले. मागील आठवडधात मात्र कापूस दरात काही प्रमाणात तेजी आली.
भाव आठ हजारांच्या दिशेने पोहोचले; परंतु, पैसा जास्त मिळत असताना, शेतकऱ्यांकडे विकायला कापूस शिल्लक राहिला नाही. व्यापारी व स्टॉकिस्टकडेच कापूस असल्याची स्थिती आहे.
तर, काही मोठे शेतकरी कापसाचे दर आठ हजार व त्यापुढे जातील, अशी आशा बाळगून आहेत. येत्या काही दिवसांत कापसाला ८ हजार रुपयांच्या पुढे भाव मिळेल, असा अंदाज कापूस व्यापारी व साठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना आहे.
सरकीच्या दरात तसेच गठानीच्या दरात तेजी आल्याने कापसाला सध्या चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याची स्थिती आहे.
शेतकऱ्यांना भावाची अपेक्षा
मेहनत करून कापूस पिकवला; मात्र, बाजारात अपेक्षेनुसार भाव मिळाला नाही. गरजेमुळे तो विकावा लागला. आता भाव वाढत आहेत. हे म्हणजे जखमेवर मीठच चोळल्यासारखे आहे. ७२०० पासून कापूस दर ७४००, ७८०० पर्यंत गेले. आणखी काही दिवस थांबल्यास ८ हजारांचा भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटते. कापूस विकलेल्या शेतकऱ्यांना मात्र आता पश्चात्ताप होत आहे.
आणखी वाढू शकतात भाव
सरकीच्या दरात सध्या तेजी आली आहे. ३४०० ते ४२०० रुपये भाव मिळत आहे, तर दर्जेदार गठाणीचा भाव ५५ हजार रुपये आहे. नवे पीक येण्यास सहा ते सात महिने अवकाश असल्याने कापूस दरात तेजी येऊ शकते. तरीही दर ७५०० ते ८००० रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी, सरकी दरवाढीचा परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीमुळे कापसाच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे सरकीतही तेजी आहे. त्यामुळे कापूस दरात वाढ झाल्याचे बोलले जाते.
हंगाम संपल्यावर भाव कसा वाढला?
कापसाचा हंगाम संपल्यानंतर भाव कसा वाढला, अशी चर्चा शेतकरी करीत असले तरी खऱ्या अर्थाने हंगाम संपण्यास किमान १ महिना अवधी आहे.
खासगी बाजारात कापूस ७ हजार ६००
सीसीआयने खरेदी बंद केल्यानंतर खासगी बाजारात कापसाला ७ हजार ६०० ते ७ हजार ८०० भाव मिळत आहे.
अधिक वाचा: जम्मू काश्मीरचं सफरचंद पिकतंय कोल्हापूरच्या मातीत; यळगूडचे शेतकरी अनिल यांचा प्रयोग यशस्वी