मंचर : उन्हाच्या तडाख्याने मेथी, कोथिंबीर यांची मर होऊ लागल्याने आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचे बाजारभाव कडाडले आहेत.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर जुडी ३४ रुपयांना तर मेथीची जुडी २८ रुपयांना विकली गेली आहे. सध्या उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे.
दिवसभर रणरणते ऊन पडलेले असते. त्यामुळे पालेभाज्यांची मर होऊ लागली आहे. उन्हाच्या तडाख्याने शेतातील पालेभाज्यांनी मान टाकली आहे. परिणामी, आवक कमी होऊन पालेभाज्यांचे दर कडाडले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंचर मुख्य बाजार आवारात सोमवारी रात्री एकूण २६ हजार ४६५ जुड्यांची भाजीपाल्याची आवक झाली.
कोथिंबिरीचे १८ हजार ९४० जुड्यांची आवक होऊन कोथिंबिरीला शेकडा ५११ ते ३४०१ असा बाजारभाव मिळाला. मेथीचे ४ हजार ८३५ जुड्यांची आवक झाली.
मेथीस शेकडा १४०१ ते २८२८ असा बाजारभाव मिळाला आहे. तसेच शेपूची २ हजार ६९० जुड्यांची आवक होऊन शेपूस शेकडा ४११ ते १४२५ असा बाजारभाव मिळाला.
किरकोळ बाजारात जुडी ५० रुपयेठोक बाजारात मेथी, कोथिंबीरचे बाजारभाव कडाडल्याने किरकोळ विक्री करताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. बाजार समितीचे लिलावात ३४ रुपये, असा एका कोथिंबीर जुडीला भाव मिळाला असला तरी किरकोळ बाजारात ही जुडी ५० रुपये या दराने विकली जाते. बाजारभाव वाढूनही शेतात उत्पादन कमी निघत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही.
चांगल्या प्रतीची मेथी, कोथिंबीर चढ्या भावाने विकली जात असली तरी खराब मालाला पाच ते दहा रुपये जुडी असा भाव मिळतो आहे. शेतकऱ्यांना शेतातील पालेभाज्यांचे पीक टिकवून ठेवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागत आहे. वाढलेली उष्णता या पिकांना मारक ठरत आहे. काही भागात पाणीसाठा कमी झाला आहे, येथे पालेभाज्या निघत नाही. यापुढे काळात पालेभाज्यांचे बाजारभाव अजून कडाडतील. - कैलास गावडे, व्यापारी
अधिक वाचा: निंबोळी अर्कासाठी कशी कराल निंबोळ्याची वाळवण व साठवणूक; वाचा सविस्तर