सोलापूरबाजार समितीत गुरुवारी १३ मार्च रोजी १६ क्विंटल हापूस आंब्याची आवक झाली. त्यास कमीत कमी दर ४००० रुपये तर जास्तीत जास्त ८००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सरासरी दर ६००० रुपये प्रति क्विंटल होता.
देवगड हापूस चवीसाठी प्रसिद्ध असून, त्यासारखा दिसणारा कर्नाटक आणि विजयवाडा हापूसदेखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाला आहे.
आंब्याच्या हंगामाची ही सुरुवात असून, लवकरच मोठ्या प्रमाणावर आवक होईल आणि दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.
सध्या प्रामुख्याने कर्नाटकहून आंब्याची आवक होत असून, त्यात लालबाग, बदामसह कर्नाटकी हापूसचा समावेश आहे. आवक वाढल्याने गेल्या दहा ते १२ दिवसांच्या तुलनेत दर कमी झाल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्नाटक आंब्याचे दर कमी झाले आहेत.
मार्च महिन्यात कर्नाटकातील आंब्यांची आवक सुरू होते. कर्नाटकातील तुमकुर परिसरातून आंब्यांची आवक होते. जून महिन्यापर्यंत कर्नाटकातील आंब्याचा हंगाम सुरू असतो.
देवगड आणि कर्नाटक हापूसमध्ये स्पर्धा
चवीला कोकणातील हापूससारखा असणाऱ्या कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून कर्नाटकातून सध्या फळबाजारात आंब्यांची मोठी आवक होत आहे. देवगड हापूस प्रति डझन १००० ते १५०० रुपये तर कर्नाटक हापूस तुलनेत स्वस्त, दर ६०० रुपये डझनप्रमाणे विक्री सुरू आहे.
अधिक वाचा: यंदा ८३ दिवसातच गाळप हंगाम संपला; देशाच्या साखर उत्पादनात होणार मोठा बदल