मिरची आगार असलेल्या नंदुरबारात घसरलेली मिरची आवक पूर्ववत होत आहे. एकीकडे ही मिरची आवक वाढत असताना व्यापारी व शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणाचा धसका घेतला आहे.
व्यापारी वर्गाला आधीच आवक घसरणीचा फटका बसून पावडर तयार करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत होत्या. त्यात गत आठ दिवसात आवक वाढून पुढे एक महिना मिरची बाजार तेजीत येण्याची शक्यता असतानाच ढगाळ वातावरणामुळे पथारींवरचा माल गोदामात रवाना करण्याची धडपड सुरु झाली आहे.
ऑक्टोबरपासून होणारा नंदुरबार जिल्ह्यातील मिरची हंगाम वेट मार्च एप्रिलपर्यंत सुरु राहत असल्याने मिरची खरेदी करणारे, पथारीवर सुकविणे आणि त्यापासून पावडर तयार करणे या उद्योगांना चालना मिळून रोजगाराची निर्मिती होते.
यंदाही जिल्ह्यात साडेसहा हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात लाली, व्हीएनआर व तेजा या वाणांची लागवड झाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडून बाजारात तेजीचे आडाखे बांधले गेले होते.
परंतु, ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी आणि खराब हवामान यामुळे मिरची पिकाला फटका बसून शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले. यामुळे बाजारात २० जानेवारी अखेरपर्यंत केवळ १ लाख ४० हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे.
यामुळे बाजार थंडावला असे चित्र असतानाच २१ जानेवारीपासून बाजार तेजीत आला होता. दर दिवशी अडीच हजार क्विंटल आवक सुरु असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चिंता वाढल्या आहेत.
मिरची पावडर तयार करणाऱ्या उद्योजकांची धावपळ
नंदुरबारमधील लाली, व्हीएनआर आणि तेजा या मिरची वाणांपासून पावडर तयार करुन त्याची निर्यात करण्यात येते. नंदुरबारात पावडर तयार करणारे ४० कारखाने आहेत. या कारखानादारांकडे डिसेंबरअखेरपर्यंत पावडर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसल्याने समस्या वाढत होत्या.
परंतू जानेवारी महिन्यातील मध्य दिलासादायक ठरुन खरेदी सुरु होती. परंतू यात आता ढगाळ वातावरणामुळे ग्रामीण भागातील मिरचीवर कीडरोग येण्याची शक्यता निर्माण झाल्याने चिंता वाढल्या आहेत.
दोन लाख क्विंटलवर हंगाम आटोपण्याची शक्यता
नंदुरबार शहरातून दरवर्षी १० हजार टन मिरची पावडर निर्यात केली जाते. यासाठी अडीच लाख क्विंटल मिरचीची खरेदी आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनी अद्याप १ लाख ४० हजार क्विंटल मिरची खरेदी केली आहे. आगामी काळात ६० हजार क्विंटल मिरची खरेदी होवू शकते. यामुळे सरासरी सात हजार टन मिरची पावडर नंदुरबारात तयार होणार आहे.
नंदुरबार बाजारात १ लाख ४० हजार क्विंटल आवक
• नंदुरबार बाजारात आजअखेरीस ओल्या लाल मिरचीला २ हजार ६०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. सुक्या लाल मिरचीला व्यापारी सर्वाधिक ९ हजार प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहेत.
• हे दर समाधानकारक असल्याने आवकमध्ये वाढ सुरु झाली होती. २० ते २४ जानेवारी दरम्यान बाजारात दरदिवशी अडीच हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे.
• नंदुरबार बाजार समितीत यंदा आवक झालेली मिरची स्थानिक व्यापारी खरेदी करुन पथारींवर (मैदाने) टाकत आहेत. याठिकाणी मिरची वाळवून कारखान्यात पाठविली जात आहे. दरदिवशी ही प्रक्रिया सुरु आहे.
• डिसेंबर महिन्यात आवक कमी झाल्याने अनेकांनी पथारी बंद केल्या होत्या. परंतू जानेवारीपासून पुन्हा आवक सुरु झाल्याने पथारींवर मिरची दिसून येत आहे.
• नंदुरबार बाजारात गतवर्षी १ ३ लाख ९५ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. यंदाही पाच हजार क्विंटल वाढीव आवक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारीअखेरीपर्यंत बाजारात मिरची येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. अंतिम टप्प्यातील मिरचीचे दरही वाढीची शक्यता आहे.
• ढगाळ वातावरणामुळे झाडावरच्या मिरचीला सूर्यप्रकाश न मिळाल्यास कीड रोगांची भिती असते. पथारींवर वाळवलेल्या मिरचीला ढगाळ वातावरण व तुरळक पावसाचा सामना करावा लागल्यास काळपट डाग पडून माल खराब होतो.
Web Summary : Chili prices in Nandurbar's market are rising again due to weather concerns, impacting powder production. The season, crucial for employment, may conclude with lower-than-expected yields and powder exports despite initial optimistic forecasts.
Web Summary : मौसम की चिंताओं के कारण नंदुरबार के बाजार में मिर्च की कीमतें फिर से बढ़ रही हैं, जिससे पाउडर उत्पादन प्रभावित हो रहा है। रोजगार के लिए महत्वपूर्ण यह सीज़न, प्रारंभिक आशावादी पूर्वानुमानों के बावजूद, कम उपज और पाउडर निर्यात के साथ समाप्त हो सकता है।