कोल्हापूर : केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्याचा साखर कोटा २४ लाख टन जाहीर केला आहे. गेल्यावर्षीपेक्षा १.२५ लाख टन साखर कोटा कमी केल्याने तेवढी साखर खुल्या बाजारात कमी येणार आहे.
परिणामी दिवाळीच्या तोंडावर साखर प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपये महागण्याची शक्यता अधिक आहे. केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक महिन्याला साखर कोटा जाहीर केला जातो.
सणासुदीमुळे साखरेला मागणी अधिक आहे. तरीही देशातील शिल्लक साखर आणि मागणी याचा ताळमेळ घालून केंद्र सरकार कोटा जाहीर करत असते. सप्टेंबर महिन्यासाठी २३.५ लाख टन साखर कोटा खुला केला होता.
ऑक्टोबर महिन्यात दिवाळी सण आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात साखरेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. तरीही केंद्र सरकारने गेल्यावर्षीपेक्षा कोटा कमी सोडला आहे. त्याचा परिणाम दरावर होणार आहे.
केंद्र सरकारने साखर कोटा बाजारात खुला करण्यासाठी हात आखडता घेतला आहे. देशात ४५ लाख टन साखर शिल्लक आहे. याचा अर्थ कारखान्याकडे साखर नसल्याचे स्पष्ट होते.
घाऊक बाजारात साखर ३९०० रुपयांवर
खुल्या बाजारात साखरेला चांगलीच तेजी असून प्रतिक्विंटल ३९०० रुपये अधिक ५ टक्के जीएसटी असा दर आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची साखर ४५ रुपये आहे. ऐन दिवाळीत यामध्ये वाढ होऊ शकते.
जाहीर केलेला कोटा आणि सणासुदीची परिस्थिती पाहता साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपयांची वाढ होऊ शकते. कारखान्यांनी साखर विक्रीचे नियोजन करून बाजारातील तेजीचा फायदा उचलण्याची गरज आहे. - पी. जी. मेढे, साखर उद्योगातील अभ्यासक
अधिक वाचा: उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर?