Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयने कापूस खरेदी मर्यादा वाढविली; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात प्रतिएकर किती कापूस खरेदी होणार

By सुनील चरपे | Updated: December 5, 2025 19:54 IST

कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे.

कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे.

या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना थाेडा दिलासा मिळाला असला तरी नवीन मर्यादा पुरेसी नसल्याने सीसीआयने मागील वर्षीप्रमाणे प्रतिहेक्टर ३० क्विंटल या अटीनुसार कापूस खरेदी करणे गरजेचे आहे.

चालू वर्षासाठी सीसीआयने नाेंदणीच्या जाचक अटींसह जिल्हा कापूस खरेदी मर्यादा कमी केली हाेती. या अटी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने लाेकमत आणि लाेकमत ॲग्राे डाॅट काॅमने नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच वृत्त प्रकाशित केले हाेते. या वृत्तांची दखल घेत कृषी विभागाने त्यांच्या कापूस उत्पादकता अहवालात सुधारणा केली.

याच नवीन अहवालाच्या आधारे सीसीआयने त्यांची कापूस खरेदी मर्यादा प्रतिएकर सरासरी एक ते दाेन क्विंटलची वाढ केली आहे. बहुतांश शेतकरी प्रतिएकर १० ते १५ क्विंटल कापसाचे उत्पादन घेत असल्याने सीसीआयची कापूस खरेदी मर्यादा ही एकरी १२ क्विंटल असावी, असे मत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद दामले यांनी व्यक्त केले आहे.

कमाल उत्पादकता ग्राह्य धरा

• ही उत्पादकता काढताना कृषी विभागाने सन २०२४-२५ मधील पीक कापणी प्रयाेगातील कापसाची सरासरी उत्पादकता व एकूण पीक कापणी प्रयाेगांपैकी उच्चतम उत्पादकता असलेल्या २५ टक्के प्रयाेगांचा आधार घेतल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

• वास्तवात, एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या मंडळातील तसेच एकाच शेतातील वेगवेगळ्या भागातील पिकांची उत्पादकता वेगवेगळी असते. ती हवामान व इतर बाबींवर अवलंबून असते. त्यामुळे सरासरी ऐवजी कमाल उत्पादकता धरणे व त्या आधारे कापूस खरेदी करणे गरजेचे आहे.

जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा

सीसीआयने नव्याने जाहीर केलेली प्रतिएकर कापूस खरेदी मर्यादा पुढीलप्रमाणे - नाशिक ७.९५ क्विंटल, धुळे ४.३०, नंदूरबार ४.९९, जळगाव ५.३४, अहिल्यानगर ६.८४, साेलापूर २.७३, छ. संभाजीनगर ५.६६, जालना ४.७६, बीड ८.४३, लातूर ९.८८, धाराशिव ६.०४, नांदेड ६.४७, परभणी ६.३३, हिंगाेली ५.३५, बुलढाणा ६.३६, अकाेला ६.१७, वाशिम ७.३९, अमरावती ८.७५, यवतमाळ ५.७८, वर्धा ९.२०, नागपूर ७.९७, चंद्रपूर ८.२४ आणि गडचिराेली जिल्ह्याची मर्यादा प्रतिएकर ९.३२ क्विंटल ठरविण्यात आली आहे.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमराठवाडाविदर्भ