Join us

Cauliflower Bajar Bhav : फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 18:50 IST

फ्लॉवरच्या दरात घसरण झाल्यामुळे एक गड्डा दहा रुपयाला विकला जात आहे. उत्पादन खर्च, तोडणी, वाहतूक, दलाली, हमाली याचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात काहीच राहत नाही.

संदीप बावचेजयसिंगपूर : फ्लॉवरच्या दरात घसरण झाल्यामुळे एक गड्डा दहा रुपयाला विकला जात आहे. उत्पादन खर्च, तोडणी, वाहतूक, दलाली, हमाली याचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात काहीच राहत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतातील पीक ओरडून स्वस्तात विकण्याची वेळ आली आहे.

उत्पादन खर्च तर बाजूलाच राहिला, काढणीचा खर्चही भागत नसल्याने काही शेतकरी स्वत:च बाजारात जाऊन दहा रुपयाला दोन गड्डे देखील विकत आहेत. सध्या मुंबई, पुण्याला जाणारा फ्लॉवर देखील थांबला आहे.

भाजीपाला पिकाला हमीभाव, नियोजनाचा अभाव यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे.

शिरोळ तालुका भाजीपाल्यांचे आगार म्हणून ओळखले जात असलेतरी हातकणंगलेबरोबरच जिल्ह्यातील अन्य ठिकाणांहून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

हॉटेल व्यावसायिकांबरोबर घरगुती आणि गोबी मंच्युरियनसाठी वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नांदणीसह दानोळी, कोथळी या भागात मोठ्या प्रमाणात फ्लॉवरचे उत्पादन घेतले जाते.

तीस ते चाळीस वर्षांपासून फ्लॉवरची शेती केली जाते. मुंबई, पुण्यासह विजापूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागांत फ्लॉवरला मोठी मागणी असते. अलीकडील काळात या पिकाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.

आंतरपीक म्हणून देखील या पिकाला प्राधान्य दिले जाते. पूर्वी धुपकाली, कातकी, आगानी अशा जातीचे फ्लॉवरचे पीक होते. आता हायब्रीडमध्ये विविध जाती विकसित झाल्या आहेत.

पाच गुंठ्यांपासून पाच एकरांपर्यंत पीक घेणारा येथील शेतकरी आहे. एकरी ३० ते ४० हजार रुपये उत्पादन खर्च असून काढणी खर्च, वाहतूक, रोप, बारदान, दलाली, हमाली याचा ताळमेळ पाहता हे पीक न परवडणारे ठरत आहे.

सध्या बाजारात दहा रुपयाला एक गड्डा विकला जात आहे. सौदे बाजारात जाऊपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दर पडल्याने पुणे, मुंबईसारख्या शहरात जाणारा माल देखील थांबला आहे. भाजीपाला शेती न परवडणारी असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

जास्तीत जास्त तीस ते चाळीस रुपयाला जाणारा गड्डा सध्या बाजारात दहा रुपयाने विकला जात आहे, तर शेतकऱ्याला पाच रुपये मिळत असले तरी एका पोत्यात बारा गड्डे असतात. त्यातून साठ रुपये मिळतात.

तीस रुपये वाहतूक खर्च, सात रुपये बारदान, दलाली हमाली पाच रुपये, पाच रुपये तोडणी खर्च, रोप व औषध फवारणीचा खर्च पाहता एका पोत्यामागे शेतकऱ्याला तोटाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे काही लहान शेतकरी स्वत:च बाजारात जाऊन दहा रुपयाला दोन विकत आहेत.

दराच्या घसरणीमुळे फ्लॉवर शेती न परवडणारी ठरत आहे. उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक यामुळे पोत्यामागे हातात काहीच शिल्लक राहत नाही. औषध व लागवडीचा खर्च देखील निघत नाही. भाजीपाला शेती पिकविणे तोट्याचेच ठरत आहे. शासनाने भाजीपाल्याला योग्य हमीभाव ठरविला तरच ही शेती परवडणार आहे. - नीलेश निशाणदार, शेतकरी नांदणी

टॅग्स :भाज्याबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीमुंबईपुणे