राज्यात तसेच देशपातळीवर हळदीच्या बाजारात तेजीचे वातावरण कायम असून, हिंगोलीबाजार समितीत हळदीचा सरासरी दर १६,३०० रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदविण्यात आला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली असून, मर्यादित आवक व निर्यात मागणी याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे.
मागील आठवड्यात हिंगोली बाजारात हळदीचा सरासरी दर १५ हजार रुपयांच्या आसपास होता. मात्र, चालू आठवड्यात हा दर वाढून १५,३६३ रुपयांवर पोहोचला. आता हे दर १६ हजार रुपयांपेक्षा जास्त झाले.
मागील वर्षाच्या तुलनेत हळदीच्या आवकेत राष्ट्रीय पातळीवर सुमारे ३७.१३ टक्के, तर राज्यपातळीवर ५.५८ टक्क्यांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तरीही मागणीच्या तुलनेत आवक मर्यादित असल्याने दर स्थिर राहण्याऐवजी वाढताना दिसत आहेत.
जागतिक बाजारात विशेष मागणी
• देशातील हळदीची साप्ताहिक आवक पाहता महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर चढ-उतार कायम असून, काही आठवड्यांत आवकेत घट झाल्याने बाजारात भावांना आधार मिळाला आहे. हळद प्रक्रिया उद्योग, आयुर्वेदिक औषधे, मसाला उद्योग तसेच निर्यातीसाठी असलेली मागणी वाढल्याने बाजारात स्पर्धा वाढली आहे.
• सन २०२४ ते २०२७ या कालावधीत जागतिक बाजारपेठेत हळदीच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरोग्यविषयक जाणीव, सेंद्रिय उत्पादनांची मागणी आणि औषधी उपयोगामुळे हळदीला जागतिक बाजारात विशेष मागणी आहे. याचा फायदा देशांतर्गत बाजारालाही होत आहे.