सोलापूर : रंगाने हिरवट, चवीला गोड असणाऱ्या आणि आवळ्यापेक्षा मोठ्या आकाराच्या अॅपल बोरांची मार्केट यार्डात आवक सुरू झाली आहे.
सफरचंदासारखा आकार असल्याने आणि रंगाने हिरवी असल्याने ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. अॅप्पल आणि चमेली या बोरांना कीड लागत नसल्यामुळे आणि चवीलाही आंबट-गोड असल्याने या बोरांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
बोरांचा हंगाम सध्या सुरू झाला असून, जिल्ह्यातील बार्शी, मंगळवेढा, माढा, मोडनिंब, अरण येथून बोरे बाजारात दाखल होऊ लागली आहेत.
किरकोळ बाजारात या चेकनेट बोरांची ६० ते १०० रुपये दराने विक्री सुरू आहे. तर किरकोळ बाजारात अॅप्पल बोरे प्रतिकिलो ४० ते ६० रुपयेप्रमाणे मिळत आहेत, अशी माहिती फळ विक्रेते फरीद शेख यांनी दिली.
१५० ते २५० क्विंटलपर्यंत आवक
▪️फळांच्या बाजारपेठेत सध्या कमी प्रमाणात बोरांची आवक होत आहे.
▪️सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २४ डिसेंबर रोजी २३७ क्विंटल आवक झाली तर २३ डिसेंबर रोजी १८९ क्विंटलची आवक झाली.
▪️त्याला किमान दर १००० ते ४२०० रुपयांपर्यंतचा मिळत आहे.
▪️येत्या आठवडाभरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
गावरान बोरं गायब
▪️थंडीच्या हंगामात रानमाळात मिळणारी आंबट, तुरट, गोड अशा स्वादिष्ट गावरान बोरांची चव निराळीच असते.
▪️मात्र, ही गावरान बोरे अलीकडच्या काळात दृष्टीआड होऊन संकरित व कलमी मोठ्या आकारांच्या बोरांचा सर्वत्र बोलबाला आहे.
अॅपलपेक्षा चेकनेटला भाव
▪️आता सफरचंदाच्या आकाराची मोठी असलेली आणि रंगाने हिरवी असलेली ही बोरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
▪️या बोरांमध्ये गर अधिक असल्याने शहरातील स्टॉल विक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
▪️अॅप्पल बोरांपेक्षा चेकनेट बोरे आकाराने लहान असतात.
▪️या बोरांची आवकही चांगली होत आहे.
▪️चेकनेट बोराला बाजारात ८० ते १०० रुपये किलोचा भाव आहे.
अधिक वाचा: पुणे जिल्ह्यात १८ पैकी १४ साखर कारखाने सुरु; सर्वाधिक गाळप व सर्वाधिक साखर उतारा कुणाचा?