Join us

बऱ्हाणपूर केळी लिलाव बाजार समितीत बोगस लिलाव; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:50 IST

Banana Market : बऱ्हाणपूर लिलाव बाजार समिती आणि तेथील व्यापाऱ्यांनी संगनमताने दावा केलेल्या किमान ४०० रुपये प्रति क्विंटल दरांनी केळी बाजारात कृत्रिम मंदी निर्माण केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या रावेर शहरातील बऱ्हाणपूर लिलाव बाजार समिती आणि तेथील व्यापाऱ्यांनी संगनमताने दावा केलेल्या किमान ४०० रुपये प्रति क्विंटल दरांनी केळीबाजारात कृत्रिम मंदी निर्माण केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

केळी कापणी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावरून बोगस लिलाव भाव जाहीर करणे, असे संशयास्पद प्रकार सुरू असल्याने संपूर्ण परिसरात असंतोष पसरला आहे. याप्रश्नी बऱ्हाणपूर व जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

एका शेतकऱ्याच्या बागेतील केळीची कापणी शनिवारीच होऊन विक्रीही रविवारी झाली होती. मात्र, सोमवारी त्या शेतकऱ्याचा कोणताही माल बाजारात नसतानाही त्याच्याच नावाने ४०० रुपये प्रति क्विंटल इतका किमान दर जाहीर करण्यात आला.

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या लिलाव पावतीमध्ये नमूद असलेल्या नावाचा संदर्भ घेऊन थेट शेतकरी आणि संबंधित ग्रुप एजन्सीच्या चालकांशी संपर्क साधला असता, हा बनाव उघडकीस आला.

यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तर देशभरातील केळी बाजार भावांवर परिणाम करणाऱ्या बऱ्हाणपूर लिलाव बाजारातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कापणी झालेल्या बागेचा माल, लिलावासाठी प्रत्यक्ष सादर न होताही, व्यापाऱ्यांनी व लिलाव समितीने संगनमत करून भाव कृत्रिमरीत्या पाडण्याचा डाव रचल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आरोप आहे.

पारदर्शकता नाही!

बऱ्हाणपूर लिलाव बाजारात दररोज कमाल, किमान व सरासरी दर जाहीर केले जातात. मात्र, त्या पाठीमागील शेतकरी व ग्रुप एजन्सी यांची नावं व संपर्क क्रमांक जाहीर केले जात नसल्यामुळे पारदर्शकतेचा पूर्ण अभाव आहे. परिणामी, केळीचे खरे बाजारभाव लपवले जात असून, केवळ निवडक माहिती जाहीर करून बाजारात दिशाभूल केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रशासनाने न्याय द्यावा!

• या पार्श्वभूमीवर रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, ज्येष्ठ संचालक योगिराज पाटील यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, बऱ्हाणपूर लिलाव बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी जळगाव व बऱ्हाणपूर जिल्हा प्रशासनाने समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

• उत्तर भारतातील पूरपरिस्थिती, वाहतूक अडचणी आणि इतर राज्यांतील केळीची वाढती आवक या कारणांमुळे केळी बाजारभावात घसरण होत असल्याचा आभास व्यापाऱ्यांकडून निर्माण केला जात असल्याने केळी उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

उत्तर भारतात पूरस्थितीमुळे वाहतूक अडचणी आहेत. मात्र, केळी उत्पादनाचा दर्जा व मागणी पाहता, अशाप्रकारे भाव पाडून शेतकऱ्यांची लूट होणे अत्यंत दुर्दैवी आहे. - बाळू महाजन, संचालक, सर्वोदय केला ग्रुप.

ठोस पावले उचलावी

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांशी भेटीची वेळ निश्चित होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलली जात नाहीत, अशीही शेतकऱ्यांत नाराजी आहे.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

टॅग्स :केळीबाजारजळगावमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरीफळे