खड़ा किंवा गरम मसाल्याच्या भावात सध्या मोठी तेजी आली आहे. लागवडीच्या वेळी अतिपावसाने जिरे, धन्याचे मोठे नुकसान झाले. जागतिक बाजारात जायपत्री, लवंग यांच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने टंचाई आहे.
त्यातच लग्नसराई, सणवार, रमजान महिना आदी यामुळे मसाल्याची मागणी प्रचंड वाढल्याने गरम मसाल्याच्या जिन्नसात दरवाढ झाली आहे.
मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचीच्या दरात उत्पादनावर परिणाम झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे १०० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. यामुळे मसाला महाग झाल्याचे दिसते.
कशामुळे मसाल्याचे उत्पादन घटले ?
लागवडीच्या वेळी काही राज्यात अतिपावसाने धने व जिन्ऱ्याचे नुकसान झाले. तरीदेखील बाजारात मसाल्याच्या सर्व पदार्थांची आवक पुरेशी आहे.
बहुतांश घरात आता पॅकिंग, रेडिमेड मसाले
• मिरची विकत आणून देठ काढून वाळविणे, भाजणे आदींची कटकट नको म्हणून बहुतांश घरांमध्ये विविध कंपन्यांच्या उत्पादीत रेडीमेड पॅकिंगचा मसाला वापरला जातो.
• तुलनेने हा मसाला ९०० ते १,२०० रुपये किलो या दरात बाजारात १००, २००, ५०० ग्रॅममध्ये उपलब्ध आहे.
•उन्ह्याळ्याच्या दिवसात मसाला तयार करण्याची लगबग घरोघरी सुरू असते. त्यानुसार खरेदी केली जात आहे.
लग्नसराई, सणवार, रमजान मध्ये मागणी वाढली
लग्नसराई, सणवार, रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी, खाद्यपदार्थांमध्ये मसाल्याचा वापर केला जातो. तसेच घरोघरी मसाला उन्हाळ्यात तयार केला जातो. त्यामुळे मागणी वाढली आहे.
आगामी काळातील भावाचा काय अंदाज ?
अमेरिका - इराण, इस्रायलच्या युध्दजन्य परिस्थितीचा फारसा परिणाम होणार नाही. कारण बहुतांश मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन भारतातच होते. त्यामुळे आगामी काळात उत्पादन व मागणीनुसार दर राहतील, असे मानले जाते.
बहुतांश मसाल्याच्या पदार्थांचे दर वाढले
बहुतांश मसाल्याच्या पदार्थांचे दर ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे दर सध्या तरी आवाक्यातच आहेत.
पण अस्सल चवीसाठी घरगुती मसाल्यांना पसंती
बाजारातील रेडीमेड मसाल्यात काही पदार्थाचा कमी-जास्त वापर केला जातो. त्याप्रमाणे त्याची चव लागते. परंतु, अस्सल चवीसाठी घरगुती मसाला बनविण्यास प्राधान्य दिले जाते. खडा मसाल्याचे प्रमाण तुलनेने जास्त असते.
पूर्वीच्या तुलनेमध्ये किती रुपयांची वाढ? (प्रतिकिलो दर)
| मसाला पदार्थ | दोन महिन्यांपूर्वी | आजचा भाव |
| धने | ११० | १२० |
| शहाजिरा | १,००० | १,१०० |
| जायपत्री | २,३०० | २,५०० |
| दगडफूल | ५५० | ६५० |
| चक्रीफूल | ६२५ | ६५० |
| रामपत्री | १,६०० | १,७०० |
| विलायची | १,७५० | १,९०० |
| नाकेश्वर | २,००० | २,००० |
गरम / खडा मसाल्यात २५ जिन्नसाचा वापर
गरम तसेच खडा मसाल्यात २५पेक्षा जास्त जिन्नस वापरले जातात. यात धने, शहाजिरा, लवंग, दालचिनी, जायपत्री, दगडफूल, तेजपान, खसखस, काळे मिरे, जिरा, चक्रीफूल, रामपत्री, सुंठ, मसाला इलायची, जायफळ, नाकेश्वर, हिंग, बडीशेप, कपूर चिनी आदींचा समावेश असतो.
तुटवडा आणि भाववाढीची शक्यता कमीच
श्रीलंका, इंडोनेशिया तसेच भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये मसाल्याचे उत्पादन होते. त्यामुळे मसाल्याचा तुटवडा किंवा मोठी भाववाढ होण्याची शक्यता कमीच आहे. - गंगाबिशन करवा, होलसेल किराणा व्यापारी, बीड.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
