Ber Market : सध्या बाजारात ॲप्पल बोरंApple Ber आणि चमेली बोरांचीChameli Ber आवक वाढू लागली आहे. बोरं चवीला आंबट-गोड लागत असल्याने अबालवृध्दांकडून याला मागणी मिळत असते. त्यामुळे येत्या काळात या फळाला आणखी मागणी वाढणार आहे.
ॲप्पल बोरं ही लांबून लहान सफरचंदासारखीच दिसतात. ॲप्पल आणि चमेली या बोरांना कीड लागत नसल्यामुळे आणि चवीलाही आंबट- गोड असल्याने या बोरांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
त्याच तुलनेत गावरान बोरांमध्ये किडींचे प्रमाण अधिक असल्याने आता नागरिक हायब्रीड बोरांकडे वळत आहेत. तसेच या बोरांना भाव ४० ते ६० रुपये प्रति किलो मिळत असल्याने शेतकऱ्यांकडूनही या बोरांची बाग लावण्याला प्राधान्य दिले जात आहे.
ॲप्पल बोरांची २५ ते ३० क्विंटलपर्यंत आवक
* फळांच्या बाजारपेठेत सध्या कमी प्रमाणात गावरान बोरांची आवक होत आहे.
* ॲप्पल बोरांची आवक ही २५ ते ३० क्विंटलपर्यंत होते. ४० रुपये किलो असा सध्या भाव मिळत आहे.
* येत्या आठवडाभरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
ॲप्पलपेक्षा चमेलीला भाव
ॲप्पल बोरांपेक्षा चमेली बोरे आकाराने लहान असतात. या बोरांची आवकही चांगली होत आहे. जवळपास ४० ते ५० क्विंटलपर्यंत सध्या आवक होत आहे. चमेली बोराला बाजारात ५० रुपये किलोचा भाव आहे.
बाजारात ग्राहकांकडून मागणी
बाजारात बोरांची आवक वाढू लागली आहे. ॲप्पल आणि चमेली या बोरांना कीड लागत नसल्याने आणि चवीलाही चांगली असल्याने या बोरांची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे. - शेख जावेद, फळ विक्रेते, महात्मा फुले भाजी मार्केट, बीड
बोरं ही ॲन्टीऑक्सिडेंट
* बोरं ही जीवनसत्वे आणि ॲन्टीऑक्सिडेंट गुणधर्माचे पॉवरहाऊस मानली जातात.
* त्यामध्ये व्हिटॅमिन सी सर्वाधिक असते. १०० ग्रॅम बोरांमध्ये ६९ मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते.
आपल्या शरीराला लागणाऱ्या 'व्हिटॅमिन सी'ची पूर्तता या फळातून होते. तसेच रक्तदाबावर नियंत्रणासाठी हे उपयुक्त आहे. लोह आणि फॉस्फरसची चांगली मात्रा असल्याने बोर रक्ताभिसरण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवते. - डॉ. सतीश भाले, आहारतज्ज्ञ