Join us

Bedana Market : यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले पण चोरट्या आयातीने गणित बिघडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:51 IST

हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल ९१ हजार टन बेदाणा उत्पादन घटले.

दत्ता पाटीलतासगाव : हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल ९१ हजार टन बेदाणा उत्पादन घटले.

त्यामुळे यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड निर्माण केले. मात्र, उच्चांकी दराला बेकायदा चिनी आयातीचा फटका बसला. उत्पादन घटले, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या दराचे गणित मात्र बिघडले आहे. अपेक्षेपेक्षा प्रति किलोला शंभर ते दीडशे रुपयांची घसरण झाली.

केंद्र आणि राज्य शासनाकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे. उत्पादनात यंदा सरासरीपेक्षा मोठी घट झाली.

नवीन बेदाण्याची आयात झाल्यानंतर, बाजारात यंदा बेदाणा दराने इतिहास निर्माण केला. उच्चांकी प्रति किलोला ८८८ रुपये इतका दर मिळवला. बेदाण्याला प्रति किलोस सरासरी ४०० ते ६०० रुपयापर्यंत दर मिळू लागला.

मात्र, जून अखेरीस चीनमधून चोरट्या मार्गाने बेदाण्याची आयात सुरू झाली. कर चुकवेगिरी करून चिनी बेदाणा सहजपणे उपलब्ध होत आहे. परिणामी बेदाण्याचा सरासरी दर ३०० ते ४०० रुपयांवर आहे.

उत्पादन कमी असताना देखील शेतकऱ्यांना प्रति किलोला दीडशे ते दोनशे रुपयांचा फटका बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी द्राक्ष उत्पादक संघटना, आणि शेतकऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला.

५२,००० टन बेदाणा शिल्लकतासगाव, सांगली, पंढरपूर, सोलापूर, पिंपळगाव, विजापूर याठिकाणी एकूण १५४ कोल्ड स्टोअरेज आहेत. त्यांची साठवणूक क्षमता २ लाख ९३ हजार ९० टन इतकी आहे. गेल्या वर्षी जुलै अखेर १ लाख टन बेदाणा शिल्लक होता. यंदा ५२ हजार टन शिल्लक आहे.

चिनी बेदाणा सहज बाजारातपंतप्रधानांनी स्वदेशीचा नारा दिला असला, तरी आयातदाराकडून त्याची खिल्ली उडवली जात आहे. चोरट्या मार्गाने कर चुकवेगिरी करून चिनी बेदाणा भारतात आयात होत आहे. याबाबत कारवाईची मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे. चोरटी आयात थांबवून बेस रेटनुसार आयात कर लागू करावा, अशी मागणी आहे. चोरट्या आयातीला वेळीच लगाम घातला नाही, तर दोन हजार कोर्टीचे परकीय चलन मिळवून देणारी आणि सुमारे ६० लाख लोकांना रोजगार देणारी द्राक्ष इंडस्ट्री संपुष्टात येण्याचा धोका आहे, अशी माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिली.

उत्पादनात तब्बल २१ हजार टनांची घट२०२४-२५ या वर्षात राज्यात २ लाख ४६ हजार ६०० टन इतके बेदाण्याचे उत्पन्न झाले होते. तर, २०२५-२६ मध्ये १ लाख ५४ हजार ८७० टन इतके उत्पन्न उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या २ हंगामात २१ हजार ७३० टनाची घट झाली आहे.

आयात कर चुकवून भारतात बेदाणा आयात होत आहे. नेपाळ मार्गे चोरट्या पद्धतीने आयात होत आहे. त्याला केंद्र शासनाने तत्काळ लगाम घालावा. आयात होणाऱ्या बेदाण्याचा उत्पादनावर आधारित बेस रेट निश्चित करून कर आकारणी करावी, अन्यथा द्राक्ष बागायतदारांना भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होणार आहे. - सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी

अधिक वाचा: Jamin Mojani : शेतजमीन मोजणी जलद होण्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय: वाचा सविस्तर

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेतीबाजारनेपाळचीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डसांगलीफलोत्पादनसरकारराज्य सरकारसोलापूरपंढरपूरकेंद्र सरकार