Join us

Bedana Market : चोरट्या मार्गाने आलेल्या चिनी बेदाण्याने भारतीय बेदाण्याचे मार्केट केले काबीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:21 IST

bedana bajar bhav भारतात चिनी बेदाण्याची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर घसरले. याच कारणाने शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावासाठी खरेदीदार फिरकले नाहीत.

सोलापूर : भारतात चिनी बेदाण्याची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर घसरले. याच कारणाने शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावासाठी खरेदीदार फिरकले नाहीत.

बाजारात बेदाण्याची आवकही शून्यावर आली हा प्रकार बेदाणा मार्केट सुरू झाल्यानंतर सोलापुरात प्रथमच घडला आहे. चीनचा बेदाणा नेपाळ, भूतान आणि बांगलादेशमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात आणला जात आहे.

चोरट्या मार्गाने कोणतेही शुल्क न भरता भारतात आलेल्या या चिनी बेदाण्याने भारतीय बेदाण्याचे मार्केट काबीज केले आहे. अत्यंत स्वस्त दरात मिळणारा हा बेदाणा खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा दिसून येते.

उच्च प्रतीचा असलेला भारतीय बेदाणा खरेदीकडे ग्राहकांचा कल कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसत आहे.

महाराष्ट्रातील सांगली, तासगाव, सोलापूर येथील बेदाणा मार्केटवर चिनी बेदाण्याचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय बेदाण्याचे दर घसरले आहेत.

सोलापूर बाजारपेठेत बेदाण्याची आवक घटली आहे. यंदाच्या वर्षी सोलापूर बाजार समितीमध्ये बेदाण्याला सर्वाधिक दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक समाधानी होते.

उच्च प्रतीचा बेदाणा बाजारात बेदखलमहाराष्ट्रातील हवामान आणि नैसर्गिक स्थितीमुळे उच्च प्रतीचा बेदाणा तयार होतो. जागतिक बाजारपेठेत या बेदाण्याला मोठी मागणी असते. या तुलनेत चिनी बेदाणा निकृष्ट दर्जाचा असून, त्यात रसायनांचा वापर अधिक असल्याने आरोग्यास घातक असतो, तरीही तो स्वस्त मिळत असल्याने ग्राहक त्याच्याकडे आकृष्ट होत असल्याचे दिसून येते.

दर आले निम्म्यावरउच्च प्रतीचा बेदाणा सोलापूर मार्केटमध्ये ५०० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. राज्यातील अन्य मार्केट पेक्षा सोलापूरमध्ये सर्वाधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा ओढा सोलापूरकडे होता. चिनी बेदाण्यांची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर २५० ते ३०० पर्यंत घसरले आहेत. या आठवड्यात सोलापूर बाजार समितीत बेदाण्याची आवक शून्यावर आली.

बेदाण्याचे दर घसरल्याने विक्रीसाठी आणण्यापेक्षा शीतगृहात ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. यंदा द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. बेदाणा निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे, म्हणूनच राज्यात चांगले दर मिळत होते. सरकारने चिनी बेदाण्याची आयात रोखली नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. - डॉ. चनगोंडा हवीनाळे, बेदाणा उत्पादक

अधिक वाचा: पिकांचे नुकसान झालेल्या याद्या 'ई पंचनामा' पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरु; लवकरच पैसे खात्यावर

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डचीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसोलापूरशेतकरीशेतीसांगली