सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात प्रतिकिलो विक्रमी ४०१ रुपयांचा दर मिळाला आहे. शिवाय ५०५ टन माल विक्रीला आला होता. त्यातील ३०३ टन मालाची विक्री झाली आहे.
मागील महिन्यापासून बेदण्याचा लिलाव सुरू झाला आहे. दर गुरुवारी लिलाव होत आहे. यंदा बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याचे प्रत्येक आठवड्यातील लिलावातून स्पष्ट झाले आहे.
सांगली, तासगाव, विजयपूर, पंढरपूर भागातील खरेदीदार सोलापुरात येत आहेत; तसेच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, बार्शी तालुक्यातील शेतकरी माल आणत आहेत. शिवाय विजयपूर जिल्ह्यातून आवक वाढली आहे.
यंदा उत्पादन कमी असल्याने सुरुवातीपासून दर वाढलेलाच आहे. आतापर्यंत कधी न मिळालेला दर यंदा मिळत आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी मालामाल होत आहेत. पुढील दोन महिने आवक राहणार आहे. सरासरी दरही २३० रुपये मिळालेला आहे.
शिर्पनहळ्ळीतील शेतकऱ्याच्या ९७५ किलो मालाला उच्चांकी दरदक्षिण सोलापूर तालुक्यातील शिर्पनहळ्ळी येथील शेतकरी लक्ष्मण बसलिंगप्पा बिराजदार यांच्या ६५ बॉक्सला म्हणजे ९७५ किलोला उच्चांकी ४०१ रुपयांचा दर मिळाला आहे. बसवराज श्रीशैल अंबारे या अडत व्यापाऱ्याकडून तासगावचे राम माळी यांनी खरेदी केली आहे. मागील दोन-तीन आठवड्यांपासून दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला आहे.
सात कोटींची उलाढालगुरुवारी ३०३ टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सरासरी दरही चांगला मिळाला आहे. त्यामुळे एका दिवसात ६ कोटी ९६ लाख ९० हजार रुपयांची उलाढाल बेदाणा मार्केटमधून झाली आहे. पुढील काही दिवस आवक वाढतच राहणार आहे.
सोलापुरातील बेदाणा मार्केटमध्ये चांगला दर मिळत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यापूर्वी सांगली, तासगावच्या मार्केटवर शेतकरी अवलंबून राहत होते. मात्र, जवळच मार्केट उपलब्ध झाल्याने आवक चांगली आहे. यंदा विक्रमी दर सोलापुरात मिळत आहे, ही बाब समाधानकारक आहे. - शिवानंद शिंगडगाव, बेदाणा व्यापारी