करकंब : करकंब (ता. पंढरपूर) येथील धनाजी महादेव व्यवहारे या तरुण शेतकऱ्याच्या बेदाण्याला पंढरपूरबाजार समितीच्या बाजारात मंगळवारी (दि.१८) तब्बल प्रतिकिलो ६०० रुपये भाव मिळाला आहे.
बेदाण्याला भाव जास्त मिळत असला तरी बेदाण्याचे उत्पादन मात्र निम्म्याहून कमी मिळत आहे. मागील तीन वर्षांपासून द्राक्षाचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे बेदाण्याचे दर खूपच घसरले होते.
उत्पादन जास्त आणि मिळत असलेला कमी भावामुळे शेतकरी वार्षिक अर्थकारणाची गोळाबेरीज करता करता मेटाकुटीला येत होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागेला कुन्हाड लावली आहे.
यंदा सर्रास शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेला निम्म्याहून कमी माल लागला होता. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या बागा फेल गेल्या आहे. यामुळे बेदाण्याचे दर वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
द्राक्षपिकासाठी येणारा वार्षिक खर्च २ लाख रुपये ते अडीच लाख रुपयांपर्यंत करावा लागतो. त्यातच बाग नैसर्गिक वातावरणामुळे माल कमी लागला किंवा फेल गेली तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत जात आहे.
चार एकरात पाच टन बेदाणा
यंदा वातावरणातील बदलामुळे बागेला मला खूपच कमी लागला. त्यामुळे चार एकर बागेतून साडेपाच टन बेदाणा होईल. साधा सोनाका जातीचा एक टन बेदाणा ६०० रुपये किलोने विकला आहे. परंतु बेदाण्याची प्रतवारी करावी लागते त्याने सर्व बेदाणा त्याच किमतीमध्ये विकला जाऊ शकत नसल्याचे धनाजी व्यवहारे यांनी सांगितले.
चालू वर्षी बेदाण्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे आज आहेत तो दर पुढे कायम राहतील अशी अपेक्षा आहे. - राहुल खंडाळकर, बेदाणा अडत दुकानदार, पंढरपूर
अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान अन् कसा मिळतो लाभ? वाचा सविस्तर