गेल्या महिन्याभरापासून केळीला दमदार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. केवळ २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल एवढाच दर केळी उत्पादकांना मिळत आहे.
परिणामी शेतकऱ्यांवर उभ्या केळीच्या बागेत ट्रॅक्टर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. शेतांमध्ये केळीचे घड पिकत असतानाचे हे विदारक चित्र सध्या जळगाव जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
बाजारपेठेत केळीचा बोर्डभाव जरी ७०० रुपयांपर्यंत दिसत असला तरी, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना हे दर मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या पदरात केवळ २०० ते ३०० रुपये पडत आहेत.
विशेष म्हणजे चांगल्या भाव मिळत नसून, केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सप्टेंबर महिन्यात १८०० रुपयांपर्यंतचे दर आता महिन्याभरापासून २०० ते ३०० रुपयांपर्यंत घसरले आहेत.
असा लागतोय खर्च..
• एका झाडाला लागतो १०० ते १३० रुपयांचा खर्च
• एका रोपाची किंमत - २१ रुपये
• दीड वर्षाचे पीक असल्याने शेत पूर्णपणे अडकते
• वर्षभरात केळीसाठी ठिबक, खत देणे, फवारणी करावी लागते.
• यासह आजार होऊ नये म्हणून बड इंजेक्शन, स्कर्टटिंग बॅग लावावी लागते.
सरासरी लागवडीपासून ते व्यापाऱ्यांच्या गाडीपर्यंत माल पोहोचवण्यादरम्यान शेतकऱ्यांना एका झाडामागे १०० ते १३० रुपयांचा खर्च लागतो.
केळीचे गणित
• एका हेक्टरवर सुमारे ४ हजार ४४४ झाडांची होते लागवड
• हेक्टरी लागणारा खर्च ७ लाख ७७हजार
• सध्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव २०० ते २५० रुपये प्रतिक्विंटल
• मिळणारा भाव व लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे १ लाख ५० हजार ते २ लाख २२ हजार रुपयांचे उत्पादन मिळत आहे.
• तर शेतकऱ्यांचे नुकसान मात्र हेक्टर मागे तब्बल १ ते दीड लाख रुपयांपर्यंतचे होत आहे.
केळीचे उभे पीक उपटून फेकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ
शेतकऱ्यांना मिळणारी किरकोळ रक्कम पाहता, शेतकऱ्यांना आपल्या शेतातून माल देणेदेखील परवडत नसल्याने बऱ्याच भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून केळीचे पीक उपटून फेकले आहे. जर ३ लाखांचे नुकसान सहन करून व तब्बल दीड वर्ष शेत अडकवून केळी लागवड करायची तर त्यापेक्षा रब्बी हंगामातील इतर पिकांची लागवड करणे शेतकऱ्यांना परवडेल अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शासनाने केळीला क्विंटलला दोन हजार शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा, जिल्ह्यातील केळी उत्पादकांची स्थिती अत्यंत खराब असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा केळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातून केळी हद्दपार होऊन जाईल. - विकास पवार, प्रगतिशील शेतकरी, चांदसर जि. जळगाव.
त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून भर केळीला बागेत ट्रक्टर भाव नाही, फिरवण्याची वेळ आली आहे. आधीच शेतकऱ्यांचे वादळी पावसामुळे नुकसान झाले असताना, केळीला भाव नसल्याने केळी उत्पादकांची स्थिती खराब झाली आहे. - डॉ. सत्त्वशील जाधव, केळी उत्पादक शेतकरी, कठोरा
अस्मानी आणि सुल्तानी संकट
आधीच वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात आता उत्पादन खर्चही न निघाल्याने भाव मिळत नसल्याने, केळी उत्पादकांवर अस्मानी व सुल्तानी (नैसर्गिक आणि सरकारी/बाजारपेठेतील) असे दुहेरी संकट ओढावले आहे. कमी दरांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने, मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
