Join us

सोलापूर बाजार समितीत एका दिवसात तब्बल सव्वादोन कोटींचा बेदाणा विकला; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:18 IST

Solapur Bedana Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातून एका दिवसात २ कोटी २५ लाख रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातून एका दिवसात २ कोटी २५ लाख रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली.

सोलापूर बाजार समितीत मागील दोन वर्षापासून आवक वाढली आहे. यंदा मागील आठवड्यात प्रतिकिलो उच्चांकी ३०१ रुपयांचा दर मिळाला होता. त्यामुळे गुरुवारी (दि. २७ फेब्रुवारी) बेदाण्याची आवक दुप्पटीने वाढली होती.

२५० टनातील १५० टन बेदाण्याची विक्री झाली, तर १०० टन माल कोल्ड स्टोरेजमध्येच राहिला आहे. या आठवड्यात २७१ रुपये कमाल दर मिळाला आहे.

सरासरी १५० रुपयांपर्यंत आहे. शिवाय चांगला प्रतीच्या मालाला २३० ते २४० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सध्या मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील बेदाण्याची आवक होत आहे.

याशिवाय कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातूनही माल येत आहे. तासगाव, सांगली, पंढरपूर, विजयपूर भागातील व्यापारी सोलापुरात येत आहेत. त्यामुळे आता बेदाण्यासाठी सोलापूर मार्केट नावारूपाला येत आहे.

कर्देहळ्ळीच्या शेतकऱ्याला दरदक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील अंकुश उद्धव पौळ यांच्या ४५ बॉक्स बेदाण्याला २७१ रुपयांचा दर मिळाला आहे. बसवराज श्रीशैल अंबारे यांच्या अडत्याकडून राम माळी यांनी माल खरेदी केला आहे. मागील आठवड्यात विजयपूरच्या शेतकऱ्यांला उच्चांकी दर मिळाला होता.

भाव आणखी वाढण्याची शक्यतायंदा बेदाण्याचे उत्पादन कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये दर आणखी वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेक शेतकरी माल कोल्ड स्टोरेज ठेवले आहेत. मागील वर्षी दर पडल्याने उत्पन्न घटले होते. त्यामुळे यंदा तूट भरून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे.

यापूर्वी सोलापुरातील माल तासगाव, सांगलीला जात होता. मात्र, आता सोलापुरात मार्केटमध्ये व्यापारी येत असल्याने आणि बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी माल सोलापुरातच विक्रीसाठी आणत आहेत. इतर बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापुरात चांगला दर मिळत आहे. - दत्तात्रय सूर्यवंशी, सचिव, बाजार समिती

अधिक वाचा: ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीसांगली