खरीप हंगामातील उडीद आणि मूग या शेतमालाची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस आवक वाढत आहे. मात्र निकृष्ट दर्जाचा माल असल्याचे सांगत खरेदीदार पुढे येईना. सोमवारी पाच टक्केदेखील मालाचा लिलाव होऊ शकला नाही.
सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील बहुतांशी पिके अडचणीत सापडली आहेत. विशेषतः पावसामुळे उडीद आणि मूग यांचे निकृष्ट उत्पादन झाल्याचे दिसून येते.
पावसाने उडीद आणि मुगाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. जे उत्पादन आले ते खराब असून त्यावर काळे डाग पडले आहेत. हा माल घेण्यास खरेदीदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे आवक झालेल्या मालातून अवघ्या १० टक्के मालाचे लिलाव झाले.
सोमवारी, २५ ऑगस्ट रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,००० क्विंटल उडीद तर १२० क्विंटल मुगाची आवक झाली होती. त्यातून उडीद ५० क्विंटल तर १५ क्विंटल मुगाचा लिलाव झाला.
निकृष्ट माल पाहून खरेदीदारांनी लिलावात भाग घेण्याचे टाळले. त्यामुळे विक्रीविना माल अडत व्यापाऱ्याकडे तसाच राहिला आहे.
सभापतींची मध्यस्थीबाजार समितीच्या अडत व्यापाऱ्यांनी उडीद आणि मूग यांचे लिलाव झाले नसल्याने समितीचे सभापती दिलीप माने यांच्याकडे धाव घेतली. याबाबत अडत व्यापारी आणि खरेदीदार यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली. त्यावर सभापतींनी मंगळवारी बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न