Join us

अकरा दिवसांच्या बंदनंतर संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्री पूर्ववत; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:06 IST

Halad Bajar Bhav : तब्बल अकरा दिवसांच्या बंदनंतर हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २ सप्टेंबरपासून पूर्ववत झाले; परंतु पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

तब्बल अकरा दिवसांच्या बंदनंतर हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २ सप्टेंबरपासून पूर्ववत झाले; परंतु पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. किमान ९ हजार ५०० ते कमाल ११ हजार ८०० रुपये भाव मिळाला.

हळदीच्या भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांसह छोट्या व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे हळदीला 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून वगळण्याची मागणी करीत मार्केट यार्डातील खरेदी विक्रीचे व्यवहार २२ ऑगस्टपासून बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर २ सप्टेंबरपासून हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत झाले.

तब्बल अकरा दिवसांनंतर मार्केटयार्ड सुरू होत असल्याने भाववाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाव वाढण्याऐवजी कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. सरासरी केवळ १० हजार ६५० रुपये एवढा भाव मिळाला. हा भाव लागवड खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हळदीला किमान १३ ते १४ हजार रुपये भाव अपेक्षित असल्याचेही काही शेतकरी म्हणाले.

१५०० क्विंटलची आवक

अकरा दिवसांच्या बंदनंतर मंगळवारपासून संत नामदेव हळद मार्केट यार्ड सुरू झाले. या दिवशी १५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्री केलेली नाही; परंतु आता भाव वाढण्याची आशा मावळली असल्याने शेतकरी हळद विक्रीसाठी काढत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा

यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली असून, अनेकांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही हळद विक्री केलेली नाही; परंतु भाववाढ होत नसल्याने आता शेतकरी हळद विक्रीसाठी काढत आहेत. सध्या सरासरी १० ते ११ हजार रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

टॅग्स :हिंगोलीबाजारशेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीविदर्भमराठवाडा