Join us

केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून लासलगाव बाजार समितीला अचानक भेट; कांदा निर्यातबंदी उठेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 11:08 IST

kanda niryat केंद्र सरकारच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी लासलगाव बाजार समितीला अचानक भेट देत तेथील लिलाव व विक्री प्रक्रियेची पाहणी केली.

लासलगाव : केंद्र सरकारच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी लासलगाव बाजार समितीला अचानक भेट देत तेथील लिलाव व विक्री प्रक्रियेची पाहणी केली.

त्याचप्रमाणे या पथकाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत चालू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेचीही माहिती घेत उपस्थितांबरोबर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्याची मागणी केली आहे.

कांद्याचे उत्पादन, खर्च, बाजारभाव तसेच निर्यात विषयक धोरण आणि शेतकरी तसेच व्यापारी वर्गाच्या अडी-अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत विविध विभागाच्या बी. के. पृष्टी, बिनोद गिरी, पंकज कुमार व सोनाली बागडे या अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीला भेट दिली.

त्यांनी यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी कायमची उठवावी, अशी जोरदार मागणी पथकाकडे केली. या पथकाने लासलगाव बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेची पहाणी केली. तेथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांशी बाजारभावाबाबत चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

यानंतर त्यांनी लासलगाव येथील नाफेड आणि एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या खरेदी केंद्राची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांकडे यातील त्रुटींबाबत विचारणा केली. यावेळी बाजार समितीच्यावतीने पथकातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य राजेंद्र डोखळे, जयदत्त होळकर, भीमराज काळे, संदीप दरेकर, प्रवीण कदम, रमेश पालवे, नरेंद्र वाढवणे, विकास सिंह आदी उपस्थित होते.

अधिक वाचा: उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डनाशिककेंद्र सरकारसरकारशेतकरीशेती