निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आता बाजारपेठेतील भाव घसरणीमुळे अधिकच भर पडली आहे. गेल्या आठवड्यात ९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेल्या तुरीच्या दरात अचानक ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याने फटका बसला आहे.
खरीप हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांची मदार तूर आणि कापूस या पिकांवर होती. तूर पिकातून दोन पैसे हाती येतील, अशी आशा असताना एकीकडे उत्पादनात घट झाली तर दुसरीकडे भावातही घसरण होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात सध्या दररोज ५०० ते ६०० क्विंटल तुरीची आवक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणण्यास सुरुवात केली होती. मात्र, अचानक क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत दर खाली आल्याने ९००० हजारांवरून जास्तीत जास्त ८४०० ते ८५०० रुपयांच्या दरम्यान भाव स्थिरावले आहेत.
आवक वाढताच भावात घसरण
मोंढ्यात गत आठवड्यात ४०० ते ५०० क्विंटल तूर विक्रीसाठी येत होती. तर गत चार दिवसांत यामध्ये वाढ होऊन आवक ६०० ते ७०० क्विंटलवर पोहोचली. अशा परिस्थितीत तुरीच्या दरात घसरण झाली. आवक वाढल्यामुळे दर घसरल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दर घसरल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे.
सोयाबीन उत्पादकांनाही बसला फटका
अतिवृष्टीच्या माऱ्यात सापडलेल्या सोयाबीन पिकाचे उत्पादन यंदा निम्म्याखाली आले. अशा परिस्थितीत किमान भाव तरी समाधानकारक मिळतील, अशी आशा होती. मात्र, शेतकऱ्यांना हंगामात कवडीमोल दराने सोयाबीन विक्री करावे लागले. त्यामुळे खरीप हंगामातून लागवड खर्चही निघाला नाही.
तुरीच्या भावात झालेली घसरण
| दिनांक | आवक (क्विंटल) | सरासरी भाव |
| २ फेब्रुवारी | ५२० | ८६०५ |
| ३ फेब्रुवारी | ७०० | ८५०० |
| ४ फेब्रुवारी | ६०० | ७९०० |
| ५ फेब्रुवारी | ६०० | ८०५० |
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
