दीपक दुपारगुडे
Marigold Flower झेंडू हे फूल आज केवळ 'पूजेचे फूल' राहिले नाही, तर ते श्रद्धा, सौंदर्य, बंध आणि समृद्धी यांचे एकत्रित प्रतीक बनले आहे.
दिवाळीत घराच्या दारावर झेंडूचे तोरण लावताना, आपण फक्त परंपरा पाळत नाही, तर आपण आपल्या संस्कृतीचे, शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि पर्यायाने, आपल्या ग्रामीण अर्थचक्राचे स्वागत करत असतो.
म्हणूनच, हा केशरी-पिवळा झेंडू आणि त्यातून फुलणारी ही 'केशरी क्रांती' आपल्या जीवनात अधिक आनंद आणि अर्थपूर्णता घेऊन येवो. या अर्थाने, झेंडूशिवाय दिवाळी खऱ्या अर्थाने अपूर्णच आहे.
दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, उत्साहाचा कल्लोळ आणि मांगल्याचा उत्सव! या सणावेळी घराघरात पसरणारा एक खास आणि प्रसन्न करणारा सुगंध असतो तो म्हणजे झेंडूच्या फुलांचा!
केशरी आणि पिवळ्या रंगाच्या या फुलांनी अवघी बाजारपेठ न्हाऊन जाते आणि याच रंगांनी आपली धार्मिक श्रद्धा आणि परंपरा अधिक तेजस्वी बनतात. पण, झेंडूचे महत्त्व केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित नाही; तो आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामीण जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
झेंडूशिवाय दिवाळी अपूर्णच! हे विधान केवळ भावना व्यक्त करणारे नसून, ते एका मोठ्या 'केशरी क्रांतीचे' द्योतक आहे, दिवाळीच्या काळात झेंडूला आलेली मागणी ही शेतकऱ्यांसाठी 'केशरी क्रांती' ठरते.
ज्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि कलाकारांच्या जीवनातही दिवाळीचा 'प्रकाश' येतो. शहरी भागात आता झेंडूचा वापर अधिक आधुनिक झाला आहे. विवाह सोहळे, कॉर्पोरेट फंक्शन्स, थिम डेकोरेशनमध्ये "मॅरीगोल्ड एस्थेटिक्स" लोकप्रिय झाले आहेत.
या नव्या रुपातही झेंडू परंपरेचा सुगंध विसरत नाही. परंपरा आणि फॅशनची सांगड घालत तो आजच्या पिढीलाही 'निसर्गाकडे परत' जाण्याचा संदेश देतो. त्यामुळे पारंपरिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो, ज्यामुळे झेंडू हे 'फूल आणि औषध' दोन्ही ठरते.
प्राचीन ग्रंथांनुसार झेंडूच्या फुलाला सूर्यदेवाचे प्रतीक मानले जाते. हे फूल सौंदर्य आणि उर्जा यांचेही प्रतीक आहे, या फुलाचा नैसर्गिक सुगंध सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींना दूर करून तणाव कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे वातावरणात शांतता टिकून राहते.
झेंडू उत्पादन अर्थचक्राचं 'ऊर्जाफूल' ठरतं
◼️ सोलापूर, सांगोला, बार्शी आणि माळशिरस तालुक्यांमध्ये झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या हंगामात झेंडूचे उत्पादन शेतकऱ्यांच्या आर्थिक उमेदला 'केशरी पंख' देते.
◼️ दिवाळीच्या काळात रोज बाजारात टनांप्रमाणे फुलं विकली जातात. शेतकरी विशेषतः गोल्डन, ऑरेंज आणि आफ्रिकन या जातींचे उत्पादन घेतात.
◼️ दिवाळीच्या काळात मागणी एवढी वाढते की मुंबई, पुणे, कोल्हापूरसह बाजारातही सोलापूरचा झेंडू पुरवला जातो.
◼️ झेंडूचा किलोदर १०० ते २०० पर्यंत पोहोचतो आणि एका छोट्या शेतकरी कुटुंबाला महिनाभराचा रोजगार मिळतो.
◼️ फुलं तोडणं, माळा तयार करणं, वाहतूक, विक्री या साऱ्या प्रक्रियेत महिलांचं ठळक योगदान असतं.
अशा रीतीने झेंडू म्हणजे ग्रामीण अर्थचक्राचं 'उर्जाफूल' ठरतं. जेव्हा आपण घरात झेंडूचं तोरण बांधतो, तेव्हा त्यामागे शेकडो हातांच्या श्रमांचा प्रकाश दरवळत असतो.
अधिक वाचा: सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी