सायबर भामट्यांचं प्रमाण सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. लोकांचं याबाबतचं अज्ञान त्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.
फेक लिंक, बनावट नोकरी, गुंतवणूक योजना, ओटीपी किंवा यूपीआय पिन चोरणे, सोशल मीडियावरून फसवणूक अशा अनेक मार्गानी नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते.
अशी फसवणूक झाल्यास घाबरून न जाता त्वरित आणि योग्य पावलं उचलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सर्वप्रथम संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी तत्काळ संपर्क साधावा.
खाते, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय त्वरित ब्लॉक करून घ्यावं, शक्य असल्यास व्यवहाराची माहिती, ट्रान्ड्रॉक्शन आयडी, वेळ, रक्कम यांची नोंद करून ठेवावी.
फसवणुकीशी संबंधित सर्व पुरावे जसे की स्क्रीनशॉट, ई-मेल, मेसेज, कॉल डिटेल्स सुरक्षित ठेवावेत. कारण ते पुढील चौकशीत उपयोगी पडतात.
फसवणुकीची अधिकृत तक्रार भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा १९३० या टोल फ्री सायबर क्राइम हेल्पलाइनवरही नोंदवता येते.
जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा सायबर सेलमध्येही लेखी तक्रार किंवा एफआयआर दाखल करता येते. अनेक वेळा 'झीरो एफआयआर' नोंदवून प्रकरण संबंधित सायबर विभागाकडे पाठवलं जातं.
वेळेत तक्रार केल्यास काही वेळा रक्कम परत मिळण्याची शक्यता असते. भविष्यात फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक न करणं, ओटीपी, पिन किंवा बँक तपशील कुणालाही न देणं आणि संशयास्पद कॉल्सपासून सावध राहणं गरजेचं आहे.
अधिक वाचा: Kisan Diwas 2025 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतंय 'या' टॉप १० योजना
