महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत सोलार पॅनल इन्स्टॉलेशनवरील तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदरील प्रशिक्षण हे छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथील दोन बॅचमध्ये ७ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान १८ दिवस चालणार आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांना सोलार पॅनल इन्स्टॉलेशन आणि तांत्रिक व उद्योजकीय कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शासनाचा सोलर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देण्याचा धोरण लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी आणि इतर लाभार्थ्यांसाठी सोलार पॅनल सबसिडी दरात उपलब्ध करावेत अशी योजना आहे. परंतु, सोलार पॅनलची दुरुस्ती करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ कमी आहे हे लक्षात घेऊन हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
कोण कोण घेऊ शकणार प्रशिक्षण?
■ सदरील प्रशिक्षण हे खुल्या प्रवर्गातील 'अमृत' लक्षित गटातील उमेदवारांसाठी म्हणजे ब्राह्मण, बनिया, वत्स, कम्मा, कायस्त, नायर, एयांगर, पाटीदार, बंगाली, पटेल, मारवाडी, यलमार, त्यागी, ठाकूर, मारवाडी, सेनगुनथर, सिंधी, राजपुरोहित, नायडू इत्यादी प्रवर्गातील लाभार्थीना सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे सहभागी होता येईल.
■ प्रवेशासाठी पात्रता शिक्षण किमान १२ वी पास, पदवीधर, तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असून वयोमर्यादा २१ ते ५० वर्ष असून मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांना प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि नियम
■ शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, तहसीलचे अधिवास प्रमाणपत्र, जातीचा उल्लेख असलेल्या कोणत्याही शासकीय कागदपत्राचा पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असल्याचे तहसील उत्पन्न दाखला, विवाहित असल्यास महिलांसाठी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड प्रवेश अर्ज सोबत झेरॉक्स प्रतीमध्ये जोडणे आवश्यक आहे.
■ www.mahaamrut.org.in या वेबसाईटवर आपला अर्ज अपलोड करून, अर्जाची हार्ड कॉपी व अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा प्रकल्प अधिकारी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र किंवा उद्योग भवन या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
■ प्रवेश अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये सादर करण्याची अंतिम दिनांक १ जानेवारी २०२५ असून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीसाठी एमसीईडी जिल्हा कार्यालय येथे निःशुल्क कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.